Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमोफत लसीच्या घोषणेवरुन महाविकास आघाडीत धुसफूस

मोफत लसीच्या घोषणेवरुन महाविकास आघाडीत धुसफूस

मुंबई

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आता लसीच्या श्रेयवादावरुन धुसफूस सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा रविवारी केली. या घोषणेसंदर्भात महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

मोफत लस सर्वांना द्यावी याबाबत ही मंत्र्यांमध्ये मतभिन्नता असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक मोफत लसीची घोषणाच करून टाकली. त्यामुळे काँग्रेस संतप्त झाली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे ही नाराजी बोलून दाखवली आहे. दुसरीकडे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट केले. मात्र नंतर हे ट्विट डिलीट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोफत लसीकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी बातमी! राज्यात मोफत लसीकरण होणार

काँग्रेसची नाराजी

राज्यात सरसकट लोकांना कोरोना लस मोफत द्यायची याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी घोषणा केली. या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील बाकी मंत्र्यांमध्ये नाराजी सूर असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मोफत लस सर्वांना द्यावी याबाबत ही मंत्र्यांमध्ये मतभिन्नता असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने श्रेयवादासाठी मोफत लसीची अचानक घोषणाच करून टाकली. त्यामुळे काँग्रेस संतप्त झाली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे ही नाराजी बोलून दाखवली आहे. ते म्हणाले, ‘आमची भूमिका स्पष्ट आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले आहे की, सर्वसामान्यांना लस मोफत दिली पाहिजे, त्याबद्दल आम्ही आग्रह धरला आहे. यात श्रेयाची लढाई सुरू आहे ती योग्य नाही. मोफत लसीकरणाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला पाहिजे. याबाबत चर्चा सुरू आहे, श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

महिलांसाठी महत्वाचे : मासिक पाळीदरम्यान लसीकरण करावे का?

आदित्य ठाकरेंकडून टि्वट डिलिट

मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्या बैठकीतही मोफत लस देण्याच्या निर्णयावर एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याला होकार दिला होता. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर निविदा काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. त्यांनतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोफत लसीकरणाचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली. मात्र नंतर त्यांनी हे ट्वीट मागे घेत लसीकरणाबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल, त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले होते…

केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे ४५ पेक्षा कमी वय असलेल्यांना केंद्र सरकार लसपुरवठा करणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर अनेक राज्यांनी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यातील लसीकरणाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. लसीकरणासाठी जागतिक निविदा काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काही तासांतच मोफत लस देण्याचा निर्णय झाल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या