
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai) वायू प्रदूषण (Pollution) वाढल्यामुळे शहरात सुरू असलेली बांधकामे आणि विकास प्रकल्पांच्या कामांमुळे धुळीचे साम्राज्य वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) काल (बुधवार) दक्षिण मुंबईतील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यावर आता माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री शिंदेंसह सरकारवर निशाणा साधला आहे...
आदित्य ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत महारस्ते घोटाळा (Scam) झाला आहे. हे प्रकरण गेल्या ११ महिन्यांपासून लावून धरले आहे. दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करू आणि रस्ते काँक्रीटचे करू, हे मुख्यमंत्री (CM) सतत खोटं बोलत आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये ५ हजार कोटींचे कत्राट काढण्यात आले होते आणि नंतर ते रद्द करण्यात आले. मग त्यांच्या मित्राने एक हजार कोटीचे कंत्राट वाढवून मागितले आणि ते ६ हजार कोटींपर्यंत गेले. यानंतर मी पत्रकार परिषदेत दोन विषय मांडले होते, असे ते म्हणाले.
पुढे ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत की, सव्वासहाशे कोटींचे अॅडव्हान्स मोबिलायजेशन आणि ४०० कोटींचा फायदा मुख्यमंत्र्यांच्या मित्रांना होणार होता. हे दोन्ही विषय मांडल्यानंतर बीकेसीत मोठा कार्यक्रम घेतला गेला. तिथे भूमिपूजन झाले आणि वर्क ऑर्डर घाईघाईत दिल्या गेल्या, पण जानेवारीपासून ३१ मेपर्यंत फारसे काम झाले नाही. पण हा विषय लावून धरल्यामुळे सव्वा सहाशे कोटी अॅडव्हान्स मोबिलायजेशनचे आणि ४०० कोटींचा जो फायदा होणार होता ८ ते ९ टक्के मिळणार होते, ते सर्व रद्द केले गेले. यामुळे आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुंबईचे हजार कोटी रुपये वाचवले, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
तसेच २०२१-२०२२ ची जी कामे आहेत, अडीच हजार कोटींची त्यांनाही सुरुवात झालेली नाही. कारण सगळीकडे कामे थांबवायला सांगितली आहेत. कारण ही कामे सुरू आहेत आणि ही कामे बंद असे कुठेही दिसायला नको. दुसऱ्या बाजूला सहा हजार कोटींची कामे सुरू आहेत, पण कुठेतरी एक मीटर खोदले आणि बॅरिकेड्स लावून ठेवले. मात्र, रस्त्याची कामे ज्या वेगाने व्हायला हवी होती, ती झाली नाहीत. ३१ मेपर्यंत ५० रस्त्यांचेही काम झालेले नाही, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
दरम्यान, सध्या जी कामे सुरू आहेत त्यामुळे धूळ येत आहे. तसेच याचा मुंबईकरांना त्रास होत आहे. मुंबईत अनेकांना सर्दी खोकला झाला असून या सरकारने प्रदूषण नियंत्रित राहण्यासाठी काहीच काम केलं नाही. मागील सरकार असताना मी पर्यावरण मंत्री होतो. त्यावेळी आम्ही काम खूप केले. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) काळात देखील कामे होत होती पण तेव्हा,असे काही झाले नाही. आता नियोजन केले जात नाही, असा आरोपही यावेळी आदित्य ठाकरेंनी केला.