
मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर भाजपच्या (BJP) काही नेत्यांकडून वैयक्तिक टीकाटिप्पणी केली जात असल्याचे बघायला मिळत आहे. त्यांची भाजपच्या काही नेत्यांकडून बेबी पेंग्विन संबोधून नेहमी खिल्ली उडवली जाते. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी एका कार्यक्रमात बोलतांना वैयक्तिक टीकाटिप्पणी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे...
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, "सहा वर्षांपूर्वी आम्ही मुंबईत पेग्विंन (Penguins) घेऊन आलो. कोणत्याही प्राण्याची जगभरातून आयात करायची असते तेव्हा मोठा पत्रव्यवहार वगैरे करावा लागतो. त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच त्यांना भारतात आणले होते. आज पेंग्विनमुळे प्राणीसंग्रहालय नफ्यात आले आहे. दरदिवशी ३० हजार लोक प्राणी संग्रहालयाला (Animal Museum) भेट देतात आणि पेंग्विन कसे आहेत हे पाहतात. आता पेंग्विनची स्थिती पाहा आणि चित्त्याची पाहा. आमच्या पेंग्विनने मुंबई पालिकेला ५० खोक्यांचे उत्पन्न मिळवून दिले. पण जे पळून गेले ते स्वतःसाठी ५० खोके घेऊन पळाले, एवढंच नव्हे तर, "मी पेंग्विनसारखं चालतो की सराकारमधील कोणी चालतं ते पाहा", असा मिश्किल टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.
तसेच पुढे आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीबाबत विचारले असता ते म्हणाले की, "बंडखोरीच्या महिनाभर आधी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदेला भेटायला बोलावले होते. आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे का हे विचारले होते. नोव्हेंबरमध्ये माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून विविध माध्यमातून ही माहिती समोर येत होती की ते पक्षात बंडखोरी करण्याच्या वाटेवर आहेत. तसेच, उद्धव ठाकरे आता रुग्णालयात आहेत, ते पक्ष चालवू शकतात का? असा प्रचारही त्यांनी केला. एखाद्या माणसांचं मन किती काळं असू शकते, ज्या माणसाने आपल्याला घडवले, जेव्हा तो रुग्णालयात असतो त्याचा फायदा घेऊन हे स्वतःचं करिअर बनवतात. ज्यावेळी त्यांना विचारलं तेव्हा ते रडू लागले आणि म्हणाले ते तुरुंगात टाकतील. तुरुंगात जाण्याचं हे वय नाही, मुलालाही तुरुंगात (Jaild) टाकतील. असे बोलून ते पळून गेले (बंडखोरी केली), असे ठाकरेंनी म्हटले.
दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरेंना आगामी निवडणुकीत राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) जाणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जे आपल्यासोबत आहेत त्यांना पुढे घेऊन जायचं हा आमचा विचार आहे. जे देशासाठी सोबत येतील त्यांना पुढे घेऊन जायचे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.