
सिन्नर। प्रतिनिधी Sinnar
येथील वावी वेस परिसरातून आज (दि.5) सायंकाळी 7.10 च्या सुमारास 12 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
चिराग तुषार कलंत्री (12)(Chirag Tushar Kalantri ) रा. काळे वाडाशेजारी, वावी वेस सिन्नर असे बालकाचे नाव आहे. चिराग आपल्या मित्रांसोबत सायंकाळी काळे वाड्या समोरील मोकळ्या जागेवर खेळत असताना सफेद रंगाच्या ओमिनी कार मधून आलेल्या काही इसमांनी चिरागला ओढून गाडीत टाकत पळ काढला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरडा केला तसेच परिसरातील नागरीकांनी ओमिनी वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी वाहनावर दगडफेक करत गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ओमिनी सुसाट वेगाने सिन्नर नगर परिषदेसमोरून फरार झाली.
त्यातील दोन इसमांनी काळ्या रंगाची पॅन्ट व डोक्यात गुलाबी रंगाची टोपी व तोंडाला काळ्या रंगाचे मास्क घातलेले असल्याचे समजते. अपहरणाच्या काही वेळानंतर चिरागच्या आईला एका नंबरवरून फोन आला असता त्यांनी पैसे तयार ठेवण्याचे सांगितले. पुन्हा फोन करतो असे सांगून फोन ठेऊन दिल्याचे समजत आहे.
यानंतर परिसरातील नागरिकांनी चिरागच्या आई-वडिलांसह सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे पोलीस ठाण्यात एकच गर्दी झाल्याचे बघायले मिळाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.