
नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत केलेल्या कर संकलनात ( tax collection)देशातील करदात्यांनी आतापर्यंतचा सर्वाधिक कर भरण्याचा विक्रम केला आहे.
वित्त मंत्रालयाने( Ministry of Finance) शनिवारी माहिती दिली की, गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी 10 फेब्रुवारीपर्यंत थेट कर संकलन 24.09 टक्क्यांनी वाढले आहे. तर, त्याच वेळी प्राप्तिकर परतावा काढून टाकल्यास सरकारच्या कर संकलनात 18.40 टक्के वाढ दिसून आली आहे.
यामुळे कर संकलन वाढवण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे. आयकर आणि कॉर्पोरेट टॅक्ससह सरकारच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 91.39 टक्के रक्कम प्रत्यक्ष करातून जमा झाली आहे.कर संकलनाच्या आकडेवारीनुसार, 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत सरकारचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 15.67 लाख कोटी रुपये आहे. त्यातून प्राप्तिकर परतावा काढून टाकल्यानंतर त्याचे संकलन 12.98 लाख कोटी रुपये झाले आहे.
जमा झालेली ही रक्कम सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पातील कर संकलनाच्या अंदाजाच्या 91.39 टक्के असून, प्रत्यक्ष कराच्या सुधारित अंदाजाच्या 78.65 टक्के आहे.देशात थेट कर दोन प्रकारे गोळा केला जातो. एक कॉर्पोरेट टॅक्सच्या स्वरूपात, तर दुसरा व्यक्तीच्या आयकराच्या स्वरूपात.ताज्या आकडेवारीनुसार कॉर्पोरेट आयकरात यंदा 19.33 टक्के वाढ झाली आहे, तर सर्वसामान्यांनी भरलेल्या आयकरात 29.63 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.परताव्याचा हिशेबा नंतर कॉर्पोरेट कर संकलनात 15.84 टक्के वाढ झाली आहे, तर सामान्यांच्या कर संकलनाचा वाढीचा दर 21.93 टक्के नोंदवण्यात आला आहे.
प्राप्तिकर परतावा रु. 2.69 लाख कोटी
दुसरीकडे 1 एप्रिल 2022 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत परत केलेल्या रकमेचा तपशीलही सरकारने दिला आहे. या कालावधीत, सरकारने 2.69 लाख कोटी रुपयांच्या परतावा अर्जांवर काम केले आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 61.58 टक्के अधिक आहे.