Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याChristmas festival : श्रद्धेसह सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश

Christmas festival : श्रद्धेसह सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण असलेल्या नाताळ सण ( Christmas festival)नाशिकरोड, जेलरोड, उपनगर परिसरात उत्साहात साजरा झाला. काल मध्यरात्रीपासूनच ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देण्यास प्रारंभ केला होता. आज एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चर्च असलेल्या जेलरोडच्या संत अण्णा चर्चामध्ये काल रात्री 10 वाजता नाताळ गीते सादर करण्यात आली. त्यानंतर अकरा वाजता महाधर्मगुरु बिशप ल्युडस डॅनिएयल यांनी पवित्रा मिसा अर्पण केली. विश्वकल्याण आणि विश्वशांती बरोबरच सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली. फादर नोलासो गोम्स, फादर विशाल त्रिभुवन यांची प्रमुख उपस्थिती होती. बिशप ल्युडस डॅनिएयल म्हणाले की, ख्रिस्त हा सर्वांसाठी आहे. तो शांती, दया, प्रेम यांचा संदेश देतो. येशूचा जन्म ही आख्यायिका किंवा नुसताच विचार नाही तर ती एक सत्य घटना आहे.

ख्रिसमस म्हणजे फक्त नवीन कापडे घालून आनंदोत्सव साजरा करणे नव्हे तर प्रभू येशूच्या आदर्श तत्वांनुसार आचरण करणे होय. दरम्यान, आज नाताळच्या दिवशी सकाळी आठ वाजता प्रार्थना झाली. फादर नोलासो गोम्स, वॉल्टर कांबळे यांनी मध्यवर्ती कारागृहात जाऊन प्रार्थन केली. बंद्यांना केक वाटून त्यांच्यासमवेत नाताळ साजरा केला. यावेळी महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. मुक्तीधामसमोरील चर्च, सेंट झेवियर्स शाळेतील बाळ येशू मंदिरातही मिसा झाल्या. सर्वच चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

बाळ येशूच्या जन्मावर व जीवनावर आधारीत देखावे चर्चेमध्ये साकारण्यात आले आहेत. ते पाहण्यासाठी गर्दी होत आहे. नाशिकरोड परिसरातील इंग्रजी व अन्य शाळांमध्ये नाताळ निमित्त सजावट करण्यात आली होती. विविध उपक्रम राबविण्यात आले. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन नाशिक-पुणे मार्गावरील सेंट झेवियर्स चर्चसह अन्य चर्चेमध्ये प्रार्थनेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्ष चर्चमध्ये तसेच ऑनलाइन प्रार्थनेची सोय करण्यात आली होती.

नाशिक कॅथलिक धर्म प्रांतात पाच जिल्हे येतात. या धर्मप्रांत अंतर्गत 36 ते 38 धर्मगुरु असून एक मुख्य महाधर्मगुरु आहेत. नाशिकरोडला धर्मगुरूंचे मुख्य निवासस्थान आहे. नाशिक कॅथलिक धर्म प्रांत पाचही जिल्ह्यांमध्ये 34 चर्च येतात. सर्व चर्च मध्ये सध्या नाताळ उत्साहात साजरा झाला. नाताळच्या चार दिवस अगोदर सुवार्ता प्रार्थना मिसासह हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रार्थनेला सुरुवात झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या