वनविभागाचा विशेष सापळा यशस्वी; बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये समाधान
वनविभागाचा विशेष सापळा यशस्वी; बिबट्या जेरबंद

म्हाळसाकोरे। कृष्णा अष्टेकर Mhalsakore

आई-वडिलांसमोरून पोटच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना रविवारी (दि.29) सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेनंतर तिसर्‍या दिवशी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. मात्र, परिसरात अजून बिबट्या असल्याचा अंदाज असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

येथील भुसे रोडवरील मुरकुटे वस्तीवर बिबट्याने आई-वडिलांसमोरून सातवर्षीय रोहन ठाकरे या बालकावर झडप घालून मकाच्या शेतात ओढत नेत ठार केले. घटनेनंतर वनविभागाने विशेष सापळा रचला. या सापळ्यात मंगळवारी (दि.31) सकाळी हा बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाला. गेल्या काही दिवसांपासून म्हाळसाकोरे व भुसे परिसरात बिबट्यांनी ऊस व मकाच्या शेतात आसरा घेतला आहे.

यापूर्वी अनेक शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यासंदर्भात वनविभागाला माहिती मिळताच त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र पिंजर्‍यात कुठलेही खाद्य अथवा बकरी नसल्याने बिबट्या जेरबंद होण्यात अडचणी येत होत्या. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातून शेतीकामासाठी आलेले मजूर घरी परतत असतांना मकाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने आई-वडिलांसमोरून पोटच्या गोळ्याला अलगद उचलून ठार केले.

या घटनेनंतर वनविभाग अधिक सतर्क झाला. घटनेनंतर वनविभागाने तत्काळ बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करीत विशेष सापळा रचला.वनविभागाचे मनमाड उपविभागाचे सह वनसंरक्षक सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे, वनपाल जाधव, वनरक्षक नागपुरे व येवला, नांदगाव, चांदवड वनपरिक्षेत्राच्या कर्मचार्‍यांनी विशेष सापळा रचून ठिकठिकाणी पिंजरे लावले. अखेर मंगळवारी मध्यरात्री बिबट्या पिंजर्‍यात अडकला. वनविभागाच्या या सापळ्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

बिबट्याची दहशत कायम

मुरकुटे वस्तीवर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असले तरी येथील शेतकरी कृष्णा मुरकुटे, सागर मुरकुटे, जिजाबाई मुरकुटे व राधिका मुरकुटे यांना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला. त्यामुळे परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याची भीती नागरिकांमध्ये आहे.

असा रचला सापळा

वनविभागाच्या नाशिक पूर्व कार्यालयातील आधुनिक बचाव पथकाची निर्मिती करण्यात आली. इको एको संस्थेचे अभिजित महाले व त्यांच्या सहकार्‍यांनी पथकाचे नेतृत्व केले. वन्यजीव संस्थेचे वैभव भोगले, वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे सुशांत रानधूर, नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील गंगाधर आघाव, रोशन दाते, स्थानिक ग्रामस्थ सरपंच, पोलीस पाटील यांच्या मदतीने विशेष सापळा रचण्यात आला.

..तर घटना टळली असती

बिबट्याने रविवारी बालकाचा बळी घेतल्यानंतर वनविभागाने पिंजर्‍यात भक्ष्यासाठी बकरी ठेवली. आधीच चटावलेल्या बिबट्याने भक्ष्यासाठी पिंजर्‍यात प्रवेश करताच तो जेरबंद झाला. घटनेपूर्वीच परिसरात लावलेल्या पिंजर्‍यात कोंबडी ऐवजी बकरी ठेवली असती तर मुलाचा जीव वाचला असता.

दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरे

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com