
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
आज कमला एकादशी (Kamala Ekadashi) आणि शनिवार असा पर्वकाळ साधून आल्याने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे भाविकांची (Devotees) मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. तर दुसरीकडे येथे आज (दि.१२ ऑगस्ट) सकाळपासून धो-धो पाऊस (Rain) सुरू आहे. त्यामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे...
त्र्यंबकेश्वर येथे सकाळपासून पाऊस कोसळत असल्याने दर्शनासाठी (Darshan) भाविक रांगेत छत्री, प्लास्टिक घुंगट घेऊन उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. तर मंदिराच्या पूर्व दरवाजाची रांग आतील पेंडॉल भरून बडा उदासीन आखाड्याकडे पोहोचेल अशी स्थिती सध्या त्र्यंबकेश्वर येथे बघायला मिळत आहे. तसेच महाद्वार पेड दर्शन म्हणजेच दोनशे रुपये भरून देणगी दर्शन पाटील गल्लीच्या कॉर्नरकडे सरकत आहे.
तर कमला एकादशीनिमित्त श्री संत निवृत्तीनाथ मंदिरात (Sant Nivrittinath Temple) दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली असून कुशावर्त कुंड वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले आहे. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून रांगेत राहणाऱ्या भाविकांसाठी राजगिरालाडू आणि बिस्किटांचे वाटप सुरु आहे.
दरम्यान, या उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत करण्यात येत असून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने महाप्रसाद योजना सुरू करावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे. तसेच भाविकांना सोयी आणि सुविधा देण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट (Trimbakeshwar Devasthan Trust) सज्ज झाले असून व्हीआयपी दर्शनाला ट्रस्टने लगाम लावला आहे.