
सिन्नर। प्रतिनिधी Sinnar
तालुक्यातील वडगाव सिन्नर येथील एका बँक मित्राच्या घरात आज (दि.19) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना घडली. घरफोडीत तब्बल 13 तोळे सोने व अडीच लाखांची रोकड लांबवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वडगाव सिन्नर येथील दत्ता गुंजाळ हे एका बँकेच्या कलेक्शनचे काम करतात. त्यांनी जवळपास अडीच लाखांचे कलेक्शन केले होते. मात्र, बँकेला दोन दिवस सुट्टी असल्याने हे पैसे आपल्या घरात ठेवले होते. आज वडगाव सिन्नर येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाचे काल्याचे कीर्तन असल्याने सर्व ग्रामस्थ सकाळी आपापल्या घराला कुलूप लावून किर्तनासाठी गेले होते.
दत्ता गुंजाळ व कुटुंबीयही घराला कुलुप लावून कीर्तनासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधत कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करत उचकापाचक केली. घरातील लोखंडी कपाटात उचकत आतील कप्य्यात ठेवलेली दीड तोळ्याची पोत, दिड तोळ्यांची नथ, 6 ग्रॅमची अंगठी, 5 तोळ्यांचा राणीहार, 6 ग्रॅमचे कानातले, 1 तोळ्यांचे लहान मुलांचे दागिने, 3 तोळ्यांची मोहनमाळ असे 13 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 2 लाख 40 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. कीर्तन संपल्यावर कुटुंबातील सदस्य घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले.
घरात जाऊन बघितले असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटात बघितले असता रोकड व दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षण संतोष मुटकुळे यांच्यासह हवालदार सारुकते यांनी भेट देत पंचनामा केला. यावेळी उपसरपंच संदीप आढाव, पोलीस पाटील मीरा पेढेकर, निलेश बलक, भाऊसाहेब शिंदे, विजय शिंदे उपस्थित होते. मात्र, दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.