Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याचोरट्यांचा धुमाकूळ; तीन घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास

चोरट्यांचा धुमाकूळ; तीन घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास

टेहरे| वार्ताहर Tehare

गावातील बंद असलेल्या तिघा घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री तोडून घरातील कपाट-तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे 12 तोळे दागिने व 20 हजाराची रोख रक्कम असा लाखो रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस येताच गावात खळबळ उडाली.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आपल्या कृत्यास अडचण येवू नये म्हणून चोरट्यांनी या घरांच्या शेजारी असलेल्या घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावण्याची दक्षता घेतल्याचे सकाळी उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

टेहरे येथील प्रल्हाद श्रावण शेवाळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यात ठेवलेले 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले. तसेच बंद असलेल्या रमेश कारभारी शेवाळे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत तिजोरी फोडून चार तोळे सोने व एक किलो चांदी लंपास केले आहे.

बाळू केदा पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने व 20 हजाराची रोख रक्कम कपाट फोडून चोरट्यांनी लांबवले मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हा धुमाकुळ घातला होता. सकाळी घराचा दरवाजा उघडकत नसल्याने ग्रामस्थांनी आरडाओरड केली असता इतर नागरीकांनी बाहेरून लावलेली कडी काढली.

यानंतर प्रल्हाद शेवाळे यांच्यासह बाळू पाटील व रमेश शेवाळे या तिघांची घरे उघडी दिसली. मात्र घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले व घरात कुणीच नसल्याचे लक्षात येताच चोरी झाल्याचा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्यासह उपनिरीक्षक सचिन लहामगे आदींनी भेट देत पाहणी केली.

श्वान पथक तसेच ठसे तज्ञ पथक देखील पाचारण करण्यात येवून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांतर्फे केला गेला. मात्र घरफोडी केल्यानंतर वाहनावरून चोरटे फरार झाल्याने तो अयशस्वी ठरला. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात प्रल्हाद शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या