
नाशिक । प्रतिनिधी Nashik
आतापासूनच पतंगाचा उत्सव ( Kite Festival)धूमधडाक्यात सुरू झाला आहे. पतंग उडवताना दुसर्याची पतंग कापण्यासाठी आपल्याकडे धारदार मांजा हवा, असे पतंगवीरांना वाटत असते. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर देखील होत असल्याचे अनेक घटकांवरून दिसून येत आहे. मात्र बंदी घातलेला मांजा विक्री कसा होतो, हे तपासने देखील महत्त्वाचे आहे. नायलॉन मांज्यामुळे शहरात सतत अपघात होत आहे. त्यामुळे नायलॉन मांजाची विक्री रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
सध्या शहरातील सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे. मागणी वाढल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पतंग तसेच मांजा विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहे. या दुकानांची नोंदणी आहे का, हे देखील तपासने महत्वाचे आहे तर दुसरीकडे जी दुकाने तात्पुरते स्वरूपात मांडण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी बंदी घातलेला मांजा देखील विक्री होत असल्याचे बोलले जात आहे.
शहर पोलीस दलाच्या वतीने विविध ठिकाणी बंदी घातलेला मांजा विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही मांजा विक्री होत असल्याचे अनेक घटनांमुळे सिद्ध होत आहे. नुकताच सातपूर अशोकनगर जाधव संकुल परिसरात दोन वेगवेगवेगळ्या घटनांत 11 वर्षीय बालक व दुचाकीस्वार नायलॉन मांजामुळे जखमी झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे. जुनेद शेख (30, रा. नवीन नाशिक) हे आपल्या दुचाकीने प्रगती शाळेजवळून घरी जात होते. त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. हाताने मांजा काढण्याच्या प्रयत्नात शेख यांचा तोल जाऊन रस्त्यावर पडले.
सायंकाळी रस्ता अतिशय व्यस्त असतो. सुदैवाने रस्त्यावर वाहतूक नसल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र यात त्यांचे दोन्ही हात व पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. दुसर्या घटनेत जाधव संकुल परिसरात सायंकाळी मैदानात खेळताना सिद्धेश जाधव (11, रा. जाधव संकुल) यांच्या हातात नॉयलॉन मांजा अडकला. या घटनेत त्याच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. जखम इतकी गंभीर होती की त्यावर सहा टाके घालण्यात आले. त्वरित उपचार केल्याने बोटे थोडक्यात वाचली आहे.