मुंबईः

राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. आता त्याच पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. परीक्षेविनाच त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. पण दहावी, बारावीची परीक्षा होणार आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला. या आधी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशा सूचना होत्या. मात्र त्यावर पुन्हा एकदा विचार करण्यात आला. आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केले जाणार आहे, असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला.

दहावी, बारावीची परीक्षा होणार

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक - दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

पहिली ते आठवीचा निर्णय

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार असल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली.