
नाशिक । प्रतिनिधी Nashik
'नमामी गोदा' प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या आराखड्यात खर्च 2 हजार 780 कोटींवर पोहचला आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारने 1 हजार 800 कोटी मंजूर केले होते.मात्र या प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 950 कोटींची वाढ झाली आहे.
महापालिकेने या प्रकल्पाचा आराखडा सादर करण्यासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक केली होती. या कंपनीने सहा महिने अभ्यास, सर्वेक्षण करुन दोन दिवसांपुर्वी आराखडा महापालिकेला सादर केला. त्यात या प्रकल्पाचा खर्च तब्बल सत्तावीसशे कोटींवर पोहचला आहे. आयुक्तांना आराखडा सादर केल्यानंतर त्याबाबत सर्व विभागांचे मार्गदर्शन मागविण्यात येईल.
प्रत्यक्षात नाशिक महापालिका आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापुर्वी 'नमामी गंगे'च्या धर्तीवर 'नमामी गोदा' हा महत्वकांक्षी प्रकल्प राबविणार आहे. त्यात प्रामुख्याने गोदेला प्रदूषण मुक्त करण्यासाठी शहरातील मलजलशुद्धिकरण प्रकल्पांचे नुतनीकरण व शहराची वाढती लोकसंख्या पाहता मखलमाबाद व कामटवाडे या ठिकाणी नवीन मलजलशुध्दिकरण प्रकल्प उभारले जाणार आहे. तसेच गोदेच्या उपनद्यांना प्रदूषण मुक्त करुन त्यांना पुनर्जिवित करणे हा महत्वाचा प्रयत्न असणार आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नमामी गोदा प्रकल्पाला महत्व आले आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा निर्धारीत वेळेत मनपाकडे सादर करण्यात आला आहे. 1,800 कोटींवरुन तो 2,780 कोटींवर हा आराखडा पोहचला आहे. सोमवारी आयुक्तांपुढे त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, मनपा