Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘या’ कारखान्यात ९४ कामगार पॉझिटिव्ह

‘या’ कारखान्यात ९४ कामगार पॉझिटिव्ह

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील शहरी लोकवस्तीत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच गोंदे दुमाला औद्योगिक वसाहती मधील वाडीवर्‍हे शिवहद्दीतील रोथे एर्ड या कारखान्यात २४ तासात तब्बल ९४ कामगार करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने कारखाना व्यवस्थापनासह आरोग्य यंत्रणा व प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

यातील इगतपुरी तालूक्यातील २८ रुग्ण असुन त्यामुळे इगतपुरी तालुक्यात विशेषता गोंदे औद्योगिक वसाहतीत आणि परिसरातील गावांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. या पार्शवभूमीवर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी आज सकाळी रोथे एर्ड, थायसेन कृप व पारले फूडस् या कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या कंपन्याना भेट देवून कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय काळजी घेतात याबाबत आढावा घेत संबंधित रोथे एर्ड, व पारले कारखाना व्यवस्थापनास काही दिवस कारखाना बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान खाजगी लॅब मधून तालुका आरोग्य यंत्रणेकडे पॉझिटिव्ह आलेल्या ९३ कामगारांपैकी काही कामगार नाशिक, सिडको, सातपुर, सिन्नर येथील असले तरी यापैकी काही कामगार हे तालुक्यातील स्थानिक पण आहेत. त्यामुळे कोरोनाचा हा उद्रेक बघता इगतपुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्याच्या लॉकडाउन काळातील हा एकाच वेळेचा सर्वात मोठा आकडा समोर आल्याने शासकीय यंत्रणेचे देखील धाबे दणाणले आहेत.

सदर ह्या पॉझिटिव्ह आलेल्या कामगारांची टेस्ट ही मंगळवारी घेतली असल्याचे समजते. त्यातीलच हे ९३ कामगार पॉझिटिव्ह असुन काल बुधवार व काल गुरुवारीही काही कामगारांचे नमुने तपासणीसाठी घेतले असुन त्याच्या अहवालातही किती पॉझिटिव्ह येतात हे अद्याप स्पष्ट झालेले नसुन या कारखान्यात अजूनही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

गोंदे आणि वाडीव-हे औद्योगिक वसाहतीमधील लॉकडाऊन काळात बंद असलेल्या सर्व कंपन्या काही अटी शर्तींवर सुरू करण्यास शासनाकडून परवानगी मिळताताच या कंपन्या सुरू झाल्या. मात्र बहुतांश कंपन्यांमध्ये सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन येत असल्याने यावर प्रशासनाकडून कार्यवाही होण्याच्या आतच आज रोथे एर्ड कंपनीत एकूण ३५० कामगारांच्या पैकी तब्बल ९४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणेतही एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान या कंपनीत एकूण जवळपास ३५० पेक्षा जास्त कामगार असुन उर्वरित कामगारांचे अहवाल येण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यापैकी अजुन किती अहवाल पॉजिटिव्ह येतील हे बघावे लागेल. विशेष म्हणजे इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील जवळपास सर्वच गावांतील तीन ते चार कामगार या आहवालात असल्याने पंचक्रोषित चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून लॉकडाऊन उठवल्यानंतर गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीमधील जवळपास सर्वच कंपन्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र अटी-शर्ती न पाळता व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाल्याने अनेक कंपन्यांमध्ये करोनाचा फैलाव झाला असुन नाशिकसह इतर रेड भागातुन कंपनीत कामासाठी येणार्‍या कामगारांमुळे या आजाराचा फैलाव होऊन इगतपुरीच्या ग्रामीण भागातही कारखान्यातील कामगारांमुळे करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गोंदे औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यामधील कामगारांच्या कोरोना टेस्ट केल्या असता अनेक कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. असे असतांना प्रशासकीय यंत्रणा कंपन्यांतील पॉझिटिव्ह रुग्णवाढ रोखण्यासाठी कार्यवाही करण्याआधीच रोथे आणि पारले कंपनीत झपाट्याने इतके रुग्ण वाढणे म्हणजे प्रशासकीय यंत्रणेचे अपयश असुन कारखाना व्यवस्थापनाने कोणतीही काळजी घेतली नसल्याचा आरोप वाडीव-हेचे सरपंच रोहिदास कातोरे, गोंदे दूमालाचे सरपंच शरद सोनवणे यांनी केला आहे.

वाडीवर्‍हे, गोंदे दुमाला औद्योगिक क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव भयानक आहे. सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आलेल्या कंपन्याचा संपूर्ण परिसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. काही दिवस सदर कारखाना बंद ठेवण्याच्या सूचना व्यवस्थापणास देण्यात आल्या आहेत.

तेजस चव्हाण, उपविभागीय अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या