बारावीत यंदा मुलीच हुश्शार! नाशिकचा निकाल ८९ टक्के

बारावीत यंदा मुलीच हुश्शार! नाशिकचा निकाल ८९ टक्के

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी -मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला.

नाशिक जिल्ह्याचा निकाल ८९. ४६ टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणे निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

विभागाचा निकाल ८८. ८७ टक्के इतका लागला असून नाशिक विभागीय मंडळात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२. ५४ टक्के आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा मंडळामार्फत दि.१८ फेब्रूवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत घेण्यात आली. प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविदयालयांमार्फत दि. १ ते १७ फेब्रुवारी २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आले होती.

जिल्ह्यातील ४३१ कनिष्ठ महाविद्यालयातून ७० हजार ३८४ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यातील ७० हजार १२९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले हाेते. पैकी ६२ हजार ७३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुस-यां दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रती पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hse.ac.in) स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविदयालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दि १७ जुलै ते सोमवार दि. २७ जुलै २०२० पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दि १७ जुलै ते बुधवार, ५ आॅगस्ट २०२० पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. ऑनलाईन पध्दतीने शुल्क (डेबिट, क्रेडीट, युपीआय व नेट बँकिंगद्वारे भरता येईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाचे विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील व सचिव नितीन उपासनी यांनी दिली आहे.

मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते

www.maharesult.nic.in

www.maharashtraeducation.com

www.hscresult.mkcl.org

परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व माहिती प्रत (प्रिंटआउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलबध आहे.

फेब्रु/मार्च २०२० परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसांपासून कार्यालयीन कामाच्या ५ दिवसात पुनर्मुल्याकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच फेब्रुवारी/मार्च २०२० च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२वी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ठ होवून उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन परीक्षामध्ये दोनच संधी श्रेणी/गुणसुधार योजने अंतर्गत उपलब्ध राहणार आहे.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com