नाशिककरांची चिंता दूर; समूहात 81.14 टक्के जलसाठा

नाशिककरांची चिंता दूर; समूहात 81.14 टक्के जलसाठा
नाशिककरांची चिंता दूर; समूहात 81.14 टक्के जलसाठा

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कमी - अधिक पाऊस झाल्यानंतर आता पावसाने काहीसी उघडीप दिली आहे.

असे असले तरी गंगापूर समूह धरणात जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर समूह धरणातील जलसाठा 72 टक्क्यांवरून 81.14 टक्के झाला आहे. तर एकट्या गंगापूर धरणातील साठा 97 टक्क्यांपर्यंत गेला आहे. परिणामी, नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर व दारणा समूह धरणातून दररोज साधारण 18.5 दश लक्ष घनफूट इतका पाणीपुरवठा केला जातो. यात 70 ते 80 टक्के भागाला गंगापूर समुह (गंगापूर, गौतमी व कश्यपी)धरणातून गंगापूर थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या धरण समूहात आज (दि.8) सकाळी 6 वाजेपर्यंत 81.14 टक्के (8195 दशलक्ष घनफूट) इतका जलसाठा नोंदविला गेला आहे.

मागील वर्षी 24 ऑगस्ट रोजी 99 टक्के इतका जलसाठा नोंदविला गेला होता. यावरुन यंदा धरण पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेसा पाऊस झालेला नव्हता, मात्र ऑगस्टच्या तिसर्‍या व चौथ्या आठवड्यात चांगला पाऊस झाला.

प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुका पश्चिम भागात चांगला पाऊस सुरू झाला असून याचा चांगला परिणाम आता दिसू लागला आहे. यामुळे गंगापूर धरणातील जलसाठा 96.82 टक्के इतका साठा झाला आहे. तसेच कश्यपी व गौतमी धरणातील साठा अनुक्रमे 68 व 80 टक्के झाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे धरण; आजची स्थिती

धरण उपयुक्त साठा आजचा साठा टक्केवारी

गंगापूर 5630 5451(द.ल.घ.फू.) 96.82

कश्यपी 1852 1253 67.65

गौतमी 1868 1491 79.79

एकूण 9350 8195 81.14

वर्षभराची चिंता मिटली नाशिक शहर हे मेट्रो सिटीकडे वाटचाल करीत असून याच पार्श्वभूमीवर मुकणे प्रकल्प आता कार्यान्वित झाला आहे. शहराच्या पुढच्या तीस वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून पाणीपुरवठ्याची योजना झाली आहे. आता गंगापूर धरण भरले असून नाशिकककरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

सतीश कुलकर्णी, महापौर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com