Friday, May 10, 2024
Homeनाशिकमहावितरणच्या ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

महावितरणच्या ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

महावितरणने (MSEDCL) कोविड प्रतिबंधक लसीकरणाला (Covid vaccination) वेग दिला असून आतापर्यंत एकूण ७९.४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात ५९ हजार ७९९ नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे…

- Advertisement -

येत्या पंधरवड्यात उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (Vijay Singhal) यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना (Corona) प्रादुर्भावामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी महावितरणच्या व्यवस्थापनाकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून स्वतः संपर्क साधला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३४ जिल्ह्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे (Frontline Workers) दर्जा देण्यात आला आहे. त्याचा लसीकरणासाठी मोठा फायदा झाला आहे.

महावितरणमध्ये कार्यरत ७५ हजार ३२३ पैकी आतापर्यंत ५९ हजार ७९९ (७९.४ टक्के) नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. यात सर्वाधिक बारामती (Baramati ) परिमंडलात ९१.२ टक्के तर पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur) ८७.८४ टक्के, कल्याण (Kalyan) ८५.९ टक्के, औरंगाबाद (Aurangabad) ८४.१ टक्के, कोकण (Konkan) ८२.२ टक्के लसीकरण झाले.

भांडूप (Bhandup) ८१.५ टक्के, नांदेड (Nanded) ८०.९ टक्के, जळगाव (Jalgaon) ८०.२ टक्के, अमरावती (Amravati) ७७.९ टक्के, नागपूर (Nagpur) ७४ टक्के, अकोला (Akola) ७३.२ टक्के, नाशिक (Nashik) ७३.५ टक्के, चंद्रपूर (Chandrapur) ७१.५ टक्के, गोदिंया (Gondia) ७०.४ टक्के आणि लातूर परिमंडलामध्ये (Latur) ६५.९ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्थानिक कार्यालयांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.

एक महिन्यापूर्वी महावितरणमधील सुमारे ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र, वीज कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामे हे आरोग्य व पोलीस विभागांप्रमाणेच अत्यावश्यक असल्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याचे तसेच परिमंडल समन्वय कक्षाचा दैनंदिन आढावा घेण्याचे निर्देश क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना देण्यात आले.

विजय सिंघल यांनी यासाठी पुढाकार घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांशी (Collector) संपर्क साधून प्रयत्न सुरु केले. परिणामी लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या महिन्याभरात ७९.४ टक्क्यांवर गेली आहे.

तसेच आतापर्यंत ४ हजार ५८ कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देखील देण्यात आला आहे. दुसऱ्या डोससाठी निश्चित केलेल्या मुदतीनुसार लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी परिमंडल व मुख्यालय स्तरावर दैनंदिन आढावा घेण्यात येत असून या ठिकाणी चार सदस्यीय कोरोना समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन येत्या १५ दिवसांमध्ये उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे.

लसीकरण झालेले असले तरी सर्वच अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत ग्राहकसेवा द्यावी आणि आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या