Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशदेशात ६६ कोटी लसींचे डोस उपलब्ध होणार; आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर

देशात ६६ कोटी लसींचे डोस उपलब्ध होणार; आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

देशात आतापर्यंत एकूण ३९ कोटी ५३ लाख ४३ हजार ७६७ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस (Covid vaccine) घेतली आहे. आता मोदी सरकारने (Central Government) लसींच्या डोसची आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर दिली आहे. लवकरच देशाला लसींचे ६६ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत…

- Advertisement -

कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (covaxin) लसींचे तब्बल १४ हजार ५०५ कोटी किमतीचे डोस भारत सरकारने मागवले आहेत. ज्यामुळे देशातल्या लस उपलब्धतेत मोठी वाढ होणार आहे.

ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान देशात १३५ कोटी डोस उपलब्ध करुन देण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. ते समोर ठेवूनच ही ऑर्डर देण्यात आली आहे. या ६६ कोटी डोस व्यतिरिक्त सरकारने कोर्बेवॅक्स (Corbevax) या लसीचे ३० कोटी डोस आगाऊ रक्कम देऊन राखीव ठेवली आहे.

म्हणजे ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशात एकूण ९६ कोटी डोस उपलब्ध होणे अपेक्षित आहे. हे ९६ कोटी डोस केंद्राच्या ७५ टक्क्यांच्या वाट्यातील असतील.

खासगी क्षेत्रामध्ये या कालावधीत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे २२ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. यामुळे २०२१ अखेरीस देशातल्या १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यास मदत होईल.

ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीतील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे उत्पादन ८८ कोटी ठरविण्यात आले आहे. जुलैत ३.५ कोटींची घट झाली असली तरी या कालावधीमध्ये कोवॅक्सिनच्या ३८ कोटी डोसचे उत्पादन घेण्यात आले आहे.

कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि कोर्बेवॅक्स यांच्या व्यतिरिक्त सरकारच्या १३५ कोटी डोसमध्ये स्पुटनिक व्ही (sputnik v) आणि झायडस कॅडिला (zydus cadila) या लसींच्या डोसचाही समावेश आहे. स्पुटनिक व्ही लसीचे स्थानिक उत्पादन अद्याप सुरु झालेले नाही तर झायडस कॅडिला या लसीला अद्याप मान्यता मिळालेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या