नाशिक विभागात ५१४ मुले अनाथ

करोना महामारीने हिरावले माता-पित्यांचे छत्र; सर्वाधिक संख्या नंदुरबारमध्ये
नाशिक विभागात ५१४ मुले अनाथ

नाशिक । खंडू जगताप

करोना संसर्गामुळे देशभरात अनेक मुलांचे आई-वडील मृत्युमुखी पडल्याने ही बालके अनाथ झाली आहेत. नाशिक विभागात ही संख्या 514 वर पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्याचा आकडा 142 आहे. सर्वाधिक 290 अनाथ बालके नंदुरबार जिल्ह्यात आहेत. अद्याप सर्व्हेक्षण सुरू असून अनाथ बालकांची संख्या आणखी वाढेल, असा अंदाज अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.

करोना महामारीच्या दुसर्या लाटेत संसर्गबाधित झाल्याने आणि योग्य ते उपचार वेळीच न मिळाल्याने मृत्यू पावणार्यांची संख्या मोठी आहे. त्यात अनेक कुटुंबेही संपली आहेत. देशभरात अनेक बालकांचे आई-वडील करोनाबळी ठरले आहेत. अनेक बालकांची आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला. अशा मुलांना योग्य वेळी मदत व्हावी, त्यांचा गैरवापर तसेच त्यांची तस्करी होऊ नये याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. शासनाने त्या आदेशाची दखल घेऊन अशा अनाथ मुलांना शोधून त्यांची सोय करण्याच्या दृष्टीने तातडीने पाऊले उचलली आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांत जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत कृती दले तयार करण्यात आली आहेत. या कृती दलांकडून मृत व्यक्तींच्या याद्यांवरून सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यात त्या-त्या कुटुंबातील मृत व्यक्ती, मुले, त्यांना सक्षमपणे सांभाळ करू शकणारे इतर सदस्य यांचे सर्वेक्षण केले जात आहे.

ज्या बालकांना तातडीने मदतीची आवश्यकता आहे, अशांना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेली अनाथलये व बालगृहांमध्ये तत्काळ सुविधा करण्यात येत आहे. कृती दलांनी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांत 25 मेपर्यंत 514 बालके अनाथ असल्याचे समोर आले आहे. त्यात दोन्ही पालक नसलेली 14 मुले आहेत तर एक पालकाचा मृत्यू झालेली बालके 308 आहेत.

कुटुंबातील कर्त्या पालकाचा मृत्यू झालेल्यांची संख्या 322 आहे. अनाथ बालकांची सर्वाधिक संख्या नंदुरबार जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 290 तर नाशिक जिल्ह्यात 142 आहे. यात दोन्ही पालक गमावलेली 6 बालके आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 17 बालके अनाथ झाली आहेत. यातील दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची सर्व सोय महिला व बालकल्याण विभाग करणार आहे. उर्वरीत बालकांना गरज असल्यास राहण्याची सोय तसेच आर्थिक व शैक्षणिक मदत केली जाणार आहे.

बालकांना तातडीची मदत

शासन आदेशानुसार कृती दलामार्फत अनाथ बालकांचे सर्वेक्षण सुरू आहे. 18 ते 25 मे या 7 दिवसांत झालेल्या सर्वेक्षणात विभागात 514 बालके आढळली आहेत. अद्याप सर्वेक्षण सुरू असल्याने अनाथ बालकांच्या संख्येत वाढ होऊ शकते. लगेच आवश्यकता असलेल्या बालकांना महिला व बालकल्याण विभागाकडून मदत सुरू करण्यात आली आहे.

- चंद्रशेखर पगारे, विभागीय उपायुक्त, महिला व बालकल्याण विभाग

Related Stories

No stories found.