नाशिक-मुंबई महामार्ग काँक्रिटीकरणासाठी 5 हजार कोटी

केंद्रीय मंत्री गडकरी यांची घोषणा
नाशिक-मुंबई महामार्ग काँक्रिटीकरणासाठी 5 हजार कोटी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक-मुंबई महामार्ग (Nashik-Mumbai Highway) काँक्रिटीकरणासाठी पाच हजार कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली.

दोन हजार 48 कोटी रुपये खर्च करून 630 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण आणि कोनशिला अनावरण समारंभात ते बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले, नाशिककरांच्या मागणीनुसार नाशिक ते मुंबई महामार्ग काँक्रिटीकरणासाठी 5 हजार कोटी निधी देणार असून नाशिक ते गोंदे हे काम तत्काळ करण्यात येईल व समृद्धी महामार्गाबरोबरच पुढील काम येत्या दोन ते अडीच वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येईल.

त्यासोबतच द्वारका येथील वाहतूककोंडी टाळण्याकरता द्वारका ते नाशिकरोड या नागपूरच्या धर्तीवर डबलडेकर उड्डाणपुलाचे भूमिपूजन येत्या पाच ते सहा महिन्यांतच करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी गडकरी यांनी देशभरासह महाराष्ट्रात केलेल्या कामांचा लेखाजोखा वाचून दाखवला. यावेळी त्यांनी सांगितले की, सिन्नरसाठी बीओटी प्रकल्प दिला. त्यात अनेक अडचणी आल्या. 3.4 कि.मी.चा सिन्नर बायपास मंजूर केला आहे. त्याचा फायदा होत शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर असा भक्तीमार्ग तयार होणार आहे. नवीन नाशिकच्या विकासासाठी आता पालकमंत्री छगन भुजबळ, महापौर व सर्व आमदारांनी एकत्र येऊन विचार करायला हवा. नवीन स्मार्ट सिटी या भागात करायला हवे.

नाशिक-मुंबई महामार्ग काँक्रिटीकरणासाठी 5 हजार कोटी
वाचा, नाशिकमध्ये काय घोषणा केल्या गडकरींनी...

सुरत-चेन्नई महामार्गासाठी एकशे तीस किलोमीटरचा रस्ता हा नाशिक जिल्ह्यातून जात असल्याने नाशिक जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर त्यात विकास होणार आहे. त्यादृष्टीने सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.

सुरतवरून येणारा महामार्ग हा पेठ,सुरगाणा या अतिदुर्गम भागातून येत असल्याने या भागांचा विकास मोठ्या प्रमाणावर होण्यास त्याची मदत होणार आहे.नाशिक-सुरत रस्त्यावर जलसंधारणाचे काम आमच्या विभागामार्फत करुन देण्यास आम्ही तयार आहोत.आमच्याकडे पैशांची कमी नाही. माझे एकही आश्वासन खोटे ठरणार नाही. नाशिकसाठी लॉजेस्टिक पार्क बांधण्यास मी तयार आहे.

यावेळी गडकरी यांनी इतर कामांबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही चाळीसगाव-नांदगाव रस्त्याचे काम करताना बंधारा बांधला. 56 क्यूबिक मीटर पाणी उपलब्ध झाले आहे. कुसुंबा-मालेगाव मार्गाचे काम करताना जलसंधारणाचे काम केले आहे. त्यामुळे या परिसरातील आठ गावांना आठ मिलियन पाणीसाठा उपलब्ध झाला. सटाणा-चांदवड असा चौपदरी रस्ता मंजूर केला आहे. दोंडाईचा-मालेगाव रस्त्यात मालेगावला वळण मार्ग होणार आहे.

नाशिक-मुंबई रस्त्याची दुरुस्ती महिन्याभरात होईल. नाशिक -गोंदे वडपे ही 99 किमीची सहा लेन मंजूर करु. दोन वर्षांत नाशिक- मुंबई प्रवास दोन तासांत होईल,असे आश्वासनही त्यांनी दिले. नाशिकचा उड्डाणपूल चांगला तयार झाला आहे. खालच्या काही भागात सौंदर्यीकरण झाले आहे. आता नाशिकमधील चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पुलाचे खालील भागाचे सौंदर्यीकरण करून घ्या. नाशिकचे वैशिष्ट्य त्यात दिसेल.

नाशिकचे हवामान खूप चांगले आहे. पर्यावरण अजून चांगले आहे. आता विकास होत आहे. परंतु विकास करतांना शहरातील पर्यावरणाचे वैशिष्ट्य कायम ठेवा. लाल दिवे मी संपवले. आता सायरन बंद करायचा आहे. आता रुग्णवाहिकेचा सायरन व पोलिसांच्या गाड्यांचा सायरनवर अभ्यास करत आहे. आता भारतीय वाद्य सर्व गाड्यांवर दिसेल, असा कायदा करणार आहे.

नाशिक-मुंबई महामार्ग काँक्रिटीकरणासाठी 5 हजार कोटी
LIVE : नाशकात १ हजार ६७८कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची आहे उपस्थिती

नाशिक शहरातील उड्डाणपूल आज बांधून पूर्ण झाला. उड्डाणपुलाच्या आराखड्यात झालेल्या चुकांमुळे 100 जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भात मला खूप दु:ख आहे. महाराष्ट्रात अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे. झिरो अपघातासाठी प्रयत्न हवे.

यावेळी व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कपिल पाटील, राज्यमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, माणिकराव कोकाटे, नरेंद्र दराडे, दिलीप बनकर,महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com