
दिल्ली | Delhi
भारताचे शेजारी राष्ट्र नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे.
या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.
पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधी हे विमान अपघातग्रस्त झाले आहेत. या विमानातील सर्वजण मृत पावल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. मात्र, विमान कंपन्या आणि सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. अपघाताची छायाचित्रे आणि फुटेज समोर आले आहेत. यावरून हा अपघात त्याच्यात खूपच भयावह असल्याचे दिसते. बचाव आणि मदतकार्यात गुंतलेल्या लोकांच्या मते, कोणीही वाचण्याची शक्याता नाही.
विमानात ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं
मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं होती. अपघाताच्या वेळी विमानात ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता.
पायलटने दोनदा मागितली लँडिंगची परवानगी
पोखरा विमानतळ एटीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर हा अपघात झाला. पोखराची धावपट्टी पूर्व-पश्चिम दिशेला बांधलेली आहे. वैमानिकाने यापूर्वी पूर्वेकडून उतरण्याची परवानगी मागितली होती आणि परवानगीही मिळाली होती. पण काही वेळातच वैमानिकाने पश्चिमेकडून उतरण्याची परवानगी मागितली आणि पुन्हा परवानगी मिळाली. पण लँडिंगच्या १० सेकंद आधी विमान कोसळले.
पोखरा विमानतळाचे १४ दिवसांपूर्वीच उद्घाटन
यति एअरलाइन्सचे एटीआर-७२ विमान पोखरा विमानतळावर पोहोचण्याच्या १० सेकंद आधी हा अपघात झाला. नेपाळच्या पोखरा विमानतळाचे १४ दिवसांपूर्वीच त्यांच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.पोखरा विमानतळ चीनच्या मदतीने उभारण्यात आले आहे. त्याच्या उभारणीसाठी चीनच्या एक्झिम बँकेने नेपाळला कर्ज दिले होते.
1 जानेवारी 2023 रोजी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय आणखी एक माहिती अशी की, ज्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानाचे उद्घाटनाच्या दिवशी डेमो फ्लाय करण्यात आले होते.