प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू

40 प्रभाग तीन सदस्सीय तर एक दोन सदस्यीय
प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू

नाशिक । फारूक पठाण

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी NMC Upcoming Elections प्रभाग रचनेचा Ward Structures कच्चा आराखडा तयार करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू झाले आहे. यासाठी मनपा आयुक्तांनी 5 स्वतंत्र पथक तयार केले आहेत. राज्य शासनाने 2022 ची निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार असल्याचे जाहीर केल्याने नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागात चाळीस प्रभाग, तीन सदस्य राहणार असून एक प्रभाग दोन सदस्यांचा राहणार आहे. यामुळे इच्छुकांची चलबिचल सुरू आहे. कोणता पट्टा कुठे जुडतो, याकडे बारकाईने लक्ष लागून आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी नाशिक महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याच्या निर्णयावर 22 सप्टेंबर रोजी शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार नाशिकमधील प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करावा, असे आदेश मिळाले आहे. 6 ऑक्टोबर 2021 पासून आराखडा तयार करण्यासाठीची सुरुवात झाली आहे. आयोगाने राज्यातील एकूण 21 महापालिकांना प्रभाग रचना तयार करायला सांगितले आहे. नाशिक शहराची 2011 मधील लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्रभाग रचना तयार होत आहे.

यानुसार 14 लाख 86 हजार 53 एवढी लोकसंख्या धरण्यात आल्याचा उल्लेख निवडणूक आयोगाच्या पत्रात आहे. अनुभवी अधिकार्‍यांची समिती नेमावी, अशी सूचना देण्यात आली होती, त्यानुसार 5 समित्या तयार करून काम सुरू झाले आहे. रचना करताना प्रभागाची लोकसंख्या दहा टक्के कमी किंवा जास्त केली तरी चालेल. प्रभागातील वस्त्यांचे विभाजन होणार नाही, प्रगणक गट फुटणार नाहीत, याची काळजी घेण्याची सूचना आहे.

प्रभाग रचना करताना उत्तरेकडून ईशान्येकडे म्हणजे उत्तर-पूर्व अशी केली जाणार आहे. त्यानंतर पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे रचना करत शेवट दक्षिण दिशेकडे होणार आहे. या गुंतागुंतीच्या रचनेत कोणाचा भाग कोणाला जोडतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. अनेक विद्यमान नगरसेवक तसेच इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

ज्या भागात विकास कामे केली तो भाग ऐनवेळी दुसर्‍या गटात गेला तर कसे करायचे अशी चिंता व्यक्त होत आहे. प्रभागांना रचनेनुसार क्रमांक दिले जातील. शक्यतो भौगोलिक स्थिती खंडित केली जाणार नाही. प्रभागातील दळणवळण, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, स्मशानभूमी, बाजाराच्या जागा, पाणीपुरवठा, प्राथमिक शाळा, मैदाने आदींचा वापर जिथे केला जातो, ते त्याच प्रभागात ठेवण्याची शक्यता आहे.

2807 प्रगणक गट

महापालिकेच्या प्रभाग रचनेसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जात आहे. त्यानुसार 14 लाख 86 हजार 53 लोकसंख्या आहे. या लोकसंख्येचे 2807 प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. यातले जवळपास 50 ते 60 प्रगणक गट एकत्र करून त्यांचा एक प्रभाग तयार केला जाईल. त्यातून 41 प्रभाग अस्तित्वात येतील. त्यात 40 प्रभागात तीन आणि एका प्रभाग दोन सदस्यीय राहणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com