Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याऑक्सिजन निर्मितीचे ३८ प्रकल्प कार्यान्वित

ऑक्सिजन निर्मितीचे ३८ प्रकल्प कार्यान्वित

मुंबई । प्रतिनिधी

ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १ हजार २५० मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादीत असून प्रत्यक्ष मागणी १ हजार ७५० मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी म्हणून हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे ३५० प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे टोपे म्हणाले.

राज्यात अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदूरबार, शहादा, बुलढाणा, वाशीम, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, सातारा, पुणे, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी रुग्णालय याठिकाणी प्लांट उभारण्यात आले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या