पोलिसांच्या गणवेशातील दरोडेखोरांनी लुटले सोने
मुख्य बातम्या

पोलिसांच्या गणवेशातील दरोडेखोरांनी लुटले सोने

हवेत बंदुकीच्या ७ गोळ्या देखील झाडल्या

Rajendra Patil Pune

पुणे

पुणे सातारा महामार्गावरी खेड शिवापूर भागातील कापूरहोळ येथील बालाजी ज्वेलर्स या सराफी दुकानात भरदिवसा दरोडेखोरांच्या टोळीने घुसून गोळीबार करत सोने लुटून नेल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दरोडेखोर पोलिसांचा गणवेश घालून आले होते. यात सुदैवाने गोळी कोणाला लागली नाही. मात्र दरोडेखोरांनी जाता-जाता दुकानातील 30 ते 35 तोळे सोने चोरून नेले. दरोडेखोर हे पोलिसांच्या वर्दीत गणवेश घालून स्विफ्ट गाडीतून आले होते, अशी माहिती ज्वेलरी शॉप मालकानं दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या कापूरहोळ गावात काल सायंकाळी पाचच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून ५ जण उतरले. यातील तिघांनी पोलिसांचा गणवेश घातला होता. हे सर्व बालाजी ज्वेलर्समध्ये गेले आणि त्यांनी दुकान मालकाला, तुम्ही चोरीचे सोने विकत घेतले, त्यामुळे तुमची चौकशी करायची असल्याचे सांगत दुकानातील आतील बाजूस नेले. त्यानंतर आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील ३० ते ३५ तोळे सोने चोरून नेले. जाता जाता त्यांनी हवेत बंदुकीच्या ७ गोळ्या देखील झाडल्या.दुकानातून बाहेर पडल्यानंतर आरोपी स्विफ्ट गाडीने साताऱ्याच्या दिशेने निघून गेले. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आरोपींना पकडण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी लावण्यात आली असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विनायक वेताळ करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com