जिल्ह्यातील धरणांत ३१ टक्के जलसाठा

गतवर्षीच्या तुलनेत ६ टक्के कमी : काटकसरीने पाणी वापरा
जिल्ह्यातील धरणांत ३१ टक्के जलसाठा

नाशिक । प्रतिनिधी

तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून बाष्पीभवन व जादा मागणीमुळे धरणातील जलसाठयात झपाट्याने घट होत आहे. सद्यस्थितित जिल्ह्यातील २४ धरणांत ३१ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी तुलनेत ६ टक्के साठा कमी असून हे प्रमाण ३७ टक्के इतके होते. दरम्यान उपलब्ध जलसाठ्यावर एक ते दीड महिना जिल्ह्याची तहान भागवावी लागणार आहे.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाउस झाला आहे. गतवर्षी गंगापूर, दारणा या मध्यम क्षमतेच्या धरणासह उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण अशी अोळख असलेले गिरणा धरण सलग दुसर्‍या वर्षी शंभर टक्के भरले होते. इतर छोटी मोठी धरणे देखील पाण्याने लबालब भरली होती. मोठया धरणातून विसर्ग सुरु होता. त्यामुळे यंदा मे महिना उजाडला तरी धरणांत समाधानकारक जलसाठा होता.

परंतु आता उन्हाची दाहकता वाढत आहे. अनेक भागांत नदी, नाले व ओढे कोरडे पडले आहेत. विहिरिंनी तळ गाठला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात वस्ती व वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे सर्वत्र पाण्याची मागणी वाढते आहे. मध्यंतरी अनेक धरणांतून शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर देखिल सुरु आहे.

एकूणच धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सद्या धरणांत ३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हवामान खात्याने मान्सून १ मे ला दाखल होईल, असे शुभवर्तमान वर्तवले आहे. पण जूनच्या प्रारंभी हजेरी लावल्यानंतर पाऊस दडी मारतो हा अलीकडचा अनुभव आहे. हा लहरीपणा लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्यावर एक ते दीड महिने जिल्ह्याची तहान भागवावी लागणार आहे. त्यामुळे काटकसरिने पाणी वापरण्याचे आव‍हन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

धरणनिहाय जलसाठा

गंगापूर - ४९

कश्यपी - १८

गौतमी गोदावरी - १२

आळंदी - ‍१८

पालखेड - ११

करंजवण - १८

वाघाड - ६

अोझरखेड - २८

पुणेगाव - १०

तिसगाव - ५

दारणा - २८

भावली - ३२

मुकणे - २४

वालदेवी - ७३

कडवा - १८

नांदूरमध्यमेश्वर - १००

भोजापूर - ११

चणकापूर - ४०

हरणबारी - ५३

केळझर - ३५

नागासाक्या -६

गिरणा - ३९

पुनद - १५

माणिकपूंज - ०

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com