
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad MIDC) गुरुवारी दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित (Power Cut) राहिला त्यानंतरही विजेचा लपंडाव सुरू असल्याने संतप्त झालेल्या उद्योजकांनी आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ (Nikhil Panchal) यांच्या नेतृत्वाखाली १३२ केवी उपकेंद्र गाठले. मात्र तेथे कुणीच जबाबदार अधिकारी न आढळल्याने आणि उपस्थित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने उद्योजकांनी पायऱ्यांवरच ठिय्या मांडून आपला निषेध नोंदवला...
त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांची समजूत काढल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र वीज पुरवठ्याचा सावळा गोंधळास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची त्वरित हकालपट्टी करावी या मागणीवर उद्योजक हटून बसल्याने त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल,असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उद्योजकांनी आंदोलन मागे घेतले.
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांना आपापल्या मालाच्या उत्पादनांच्या ऑर्डर पूर्ण करावयाच्य असल्याने उद्योजकांची त्यासाठी एकच धावपळ सुरु आहे. त्यासाठी त्यांना अखंड वीज पुरवठा हवा असतो. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे गेल्या आठवड्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
गुरुवार (दि.२१) महावितरणने कोणतीही पूर्व सूचना न देता अंबड औद्योगिक वसाहतीतील विद्युत पुरवठा दीर्घकाळ खंडित ठेवला.दुसऱ्या दिवशीही त्यात काही सुधारणा झाली नाही.शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहिल्याने आणि वारंवार विजेचा लपंडाव सुरू असतो हे लक्षात आल्याने उद्योजकांनी थेट १३२ केवी उपकेंद्र गाठले.
तिथे कुणी जबाबदार अधिकारी न आढळल्याने पायऱ्यावर बसूनच अधिकाऱ्यांची वाट बघत आंदोलन सुरू केले. यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने उद्योजकांनी त्यांना धारेवर धरले.आम्ही प्रीमियम रेटने वीज बिल अदा करतो.सतत वीजपुरवठा बंद व वारंवार खंडित होत असल्याने उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत विजेचा लपंडाव आहे तर नित्याचेच झाले आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता विद्युत पुरवठा खंडित होत असेल तर आम्ही उद्योग चालवायचे कसे असा खडा सवाल करून पांचाळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दोन दिवसात आमचे तीनशे कोटीचे नुकसान झाले आहे ते कोण भरून देणार. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जोपर्यंत या घटनेस जबाबदार असलेले उप अभियंता अजय नागरे आणि कार्यकारी अभियंता ललित पाटील या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे त्यांनी ठणकावल्यानंतर कार्यकारी अभियंता प्रवीण भालेराव आणि चेतन वाडे यांनी त्यांची तसेच अन्य उद्योजकांची समजूत काढली.
यापुढे विद्युत पुरवठा खंडित होणार नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर उद्योजकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे आणि कुंदन डरंगे हेसुद्धा यावेळी खूप आक्रमक दिसले.खंडीत वीजपुरवठ्यामुळे अनेक उद्योगांची मशीनरी व उपकरणे जळून खाक झाली आहेत. घटनेचा जाब विचारण्यासाठीआम्ही सब स्टेशनला भेट दिली असता तेथे नोंद रजिस्टर आढळले नाही.
उलट आम्हाला उडवा उडवीची उत्तरे मिळाली.अधिकारी व कर्मचारी वर्गाची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. यापुढे असा प्रकार घडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशाराही उद्योजकांनी दिला.यावेळी आयमाचे उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, कुंदन डरंगे,गोविन्द झा,देवेंद्र विभुते, श्रीलाल पांडे,विश्वास कुदळ आदींसह आयमा निमाचे सदस्य आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे विद्युत पुरवठा खंडित राहिल्यास उद्योजक एक महिन्याचे बिल भरणार नाही,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
उद्योजकांचे तीनशे कोटी रुपयांचे नुकसान झाले असून ही निश्चितच गंभीर बाब आहे.शुक्रवारी सकाळी आम्ही उपकेंद्राला भेट दिली असता तेथे एकही अधिकारी हजर आढळला नाही हे तर आश्चर्यच म्हणावे लागेल. या संपूर्ण प्रकरणाची सर्वंकष चौकशी झाली पाहिजे.
- निखिल पांचाळ, अध्यक्ष, अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.