गडचिरोलीत मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान

कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?
गडचिरोलीत मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली | Gadchiroli

महाराष्ट्राच्या सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यात ठाण मांडून असलेल्या नक्षलवाद्यांवर शनिवारी पोलिसांना मोठा प्रहार केला.

गडचिरोली पोलिसांच्या सी-६० जवानांनी केलेल्या कारवाईत २६ नक्षलवादी ठार झाले. सुमारे चार तास चाललेल्या या चकमकीत जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला आहे. गडचिरोली पोलिसांनी या माहिती दुजोरा दिला आहे.

चकमक झाल्यानंतर त्या भागात सर्चिंग ऑपरेशन दरम्यान अत्याधुनिक शत्रसाठा आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य, २६ नक्षल्यांचे शव रात्री उशिरा कोटकल पोलीस मदत केंद्रात पोहोचविण्यात आले.

दरम्यान मारल्या गेलेल्या नक्षल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काल चकमकीनंतर शोध अभियानात रात्र झाल्याने घटनास्थळी शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मात्र आज सकाळपासून परत एकदा या भागात शोध मोहीम राबवली जात आहे.

कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?

शनिवारी झालेल्या चकमकीत कुख्यात माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे हा ठार झाला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे भाऊ आहे. भिमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी पोलिसांत त्याची नोंद आहे. १ मे २०१९ रोजी गडचिरोलीत कुरखेडा – जांभुळखेडाज पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागे मिलिंद तेलतुंबडेचा हात असल्याचा संशय होता. त्याच्यावर ५० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले होते. नक्षलवादी चळवळ शहरी भागात रुजवण्यात त्याचा हात होता. केंद्र सरकारच्या मोस्ट वॉण्टेड नक्षलवाद्यांच्या यादीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर हत्या देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल होते.

सी-६० कमांडो नाव कसं पडलं?

गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून संपूर्ण परिसरात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी १ डिसेंबर १९९० रोजी सी-६० ची स्थापना केली. त्यावेळी या दलात केवळ ६० विशेष कमांडोची भरती करण्यात आली होती, ज्यावरून हे नाव मिळाले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले. प्रथम उत्तर विभाग, दुसरा दक्षिण विभाग.

गृहमंत्रालयाचे ट्विट

आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले, असे ट्विट गृहमंत्रालयाने केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com