Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानिफाड ड्रायपोर्टसाठी 250 कोटींची गुंतवणूक : सेठी

निफाड ड्रायपोर्टसाठी 250 कोटींची गुंतवणूक : सेठी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्याचे औद्यागिक,कृषी महत्व लक्षात घेऊन जवाहरलाल नेहरू पोर्ट अ‍ॅथॉरिटीच्या (Jawaharlal Nehru Port Authority ) वतीने निफाड तालुक्यात बहुप्रकल्पीय ड्राय पोर्ट सुरू करण्यात येणार आहे. शासनाने यासाठी 250 कोटी गुंतविले असून या अनुषंगाने पायाभूत सोयी सुविधा देण्यात येत आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ) अनुषंगाने सर्व विभाग या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

ड्राय पोर्ट होण्यासाठी निफाडसह नाशिक तालुक्यातील राजकीय मंडळी प्रयत्नशील होती. निफाड तालुक्यातच हे बंदर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज नाशिकमध्ये गुंतवणूकदार परिषद झाली. यावेळी सेठी यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना नाशिकचे व्यावसायिक आणि औद्योगिक मूल्य लक्षात घेता या ठिकाणी बहुप्रकल्पीय ड्राय पोर्ट सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

सेझ आणि पोर्टचे काम सारखे आहे. या अनुषंगाने व्यावसायिक, उद्योजकांना आयात-निर्यातीसाठी आवश्यक शासकीय परवानग्या मिळवून देण्यासाठी काम करण्यात येणार आहे. यामुळे पैसा आणि वेळ वाचणार आहे. राज्यात सांगली, वर्धा, जालना आणि नाशिक येथे ड्राय पोर्ट तयार करण्यात येणार आहे. वर्धा आणि जालना परिसरात बंदराचे काम अंतिम टप्प्यात असून नाशकात आगामी काळात काम सुरू होणार आहे. यामुळे उद्योग, व्यवसाय यातील अस्थिरता थांबेल, त्यातील धोक्याची तीव्रता कमी होईल. आयात- निर्यातीसाठी मालाची देवाण घेवाण सुलभ होईल. यामुळे नाशिकच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकण्यासाठी हा प्रयत्न आहे. निफाड येथे या बंदरासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्यात गुंतवणूक करण्यात येणार आहे. बंदर सक्षमपणे कार्यान्वित होण्यासाठी रस्ता प्राधिकरण तसेच रेल्वेशी चर्चा सुरू आहे. समृध्दी महामार्गाचा फायदा सर्व प्रकल्पांना होणार आहे. या सर्व सेवेचा लाभ उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन सेठी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या