नाशिकमध्ये अकरावीच्या आहेत 'एवढ्या' जागा
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये अकरावीच्या आहेत 'एवढ्या' जागा

काळजीपूर्वक अर्ज करा; शिक्षण उपसंचालकांचे आवाहन

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्‍या पंचवीस हजार जागा उपलब्‍ध आहेत. तरी विद्यार्थ्यांनी आपले गुण, वास्तव्‍याचे ठिकाण यासह अन्‍य तपशील लक्षात घेऊन प्रवेश अर्ज भरावा.

अर्ज भरण्यासह शुल्‍क भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन असल्‍याने काळजी घ्यावी. तसेच प्रवेशासाठी महाविद्यालय निवडतांना प्रवास व अन्‍य बाबींचा विचार करून पर्यायाची निवड करावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले.

बुधवारी (दि.२२) शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासंदर्भात ऑनलाइन कार्यक्रम पार पडला. तीन सत्रांत पार पडलेल्‍या या कार्यक्रमांत कनिष्ठ महाविद्यालय, पडताळणी केंद्रातील समन्‍वयक यांच्‍याशीही चर्चा करत त्‍यांच्‍या शंकांचे निरसन करण्यात आले.

तर अंतिम सत्रात विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. यावेळी योगेश काळे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना माहिती दिली. शिक्षण उपसंचालिका पुष्पावती पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तर विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया समितीचे सदस्‍य वैभव सरोदे यांनी विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात सविस्‍तर माहिती दिली. पालकांनी ऑनलाइन शुल्‍क अदा करतांना सावधगिरी बाळगावी. लॉगइन आयडी, पासवर्डसह अन्‍य गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे नमूद केले.

प्रवेश प्रक्रियेतील अन्‍य नियम, आरक्षणाबद्दलची माहिती त्‍यांनी दिली. नियमित तीन फेऱ्या होणार असून, विशेष फेरी, कोटा, इनहाउस प्रवेश आदींच्‍या संदर्भातही माहिती यावेळी दिली.

कोट्यातील प्रवेश घेतांना विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरलेला असणे महत्त्वाचे असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. तसेच महाविद्यालयांनी पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी स्‍वतःची प्रणाली विकसीत करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्‍या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com