मालेगावी 25 नवे बाधित

करोना बाधित
करोना बाधित

मालेगाव । प्रतिनिधी | Nashik

शहरासह तालुक्यात करोनाचा उद्रेक थांबण्याची चिन्हे दिसत नसून आज दिवसभरात 25 पॉझिटीव्ह आढळले. यामध्ये 12 शहरातील तर 13 तालुक्यातील बाधितांचा समावेश आहे. चंदनपुरी, द्यानेपाठोपाठ अजंग व चिखलओहोळ येथे करोनाने शिरकाव केला.

या रूग्णवाढीने शहरात बाधितांची संख्या 1 हजार 97 वर तर ग्रामीणमध्ये 95 वर पोहचली आहे. शहरासह ग्रामीण भागात करोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्याने तालुक्यातील जनतेत चिंतेचे सावट पसरले आहे.

या एक वर्षाची बालिका, अडीच वर्षाचा मुलगा, चार, पाच, सहा व अकरा वर्षाच्या मुलांचा असलेला समावेश धक्का देणारा ठरला आहे. द्याने येथे संक्रमण थांबले नसल्याचे आज स्पष्ट झाले.

अडीच वर्षाच्या मुलासह एकाच कुटूंबातील तीन महिला व चाळीस वर्षीय इसम पॉझिटीव्ह आढळून आले. तालुक्यातील अजंग येथे एकाच कुटूंबातील वडिल, मुलगा, मुलगी असे चौघे बाधित आढळून आल्याने गावात खळबळ उडाली.

तर जळकू गावात देखील संक्रमण सुरूच असून चार व सहावर्षीय बालकांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. चंदनपुरी येथे 1 वर्षीय बालिकेसह 24 वर्षीय युवक, 22 व 40 वर्षीय महिला असे 5 जण पॉझिटीव्ह आले आहेत. चिखलओहोळ गावात करोनाने शिरकाव असून 50 वर्षीय इसम बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील जयरामनगर, कुसूंबारोड, विवेकानंद कॉलनी कॅम्प, कॉलेजरोड, मोहनपीर गल्ली, कापसे गल्ली आदी भागातून पॉझिटीव्ह रूग्ण पुन्हा आढळून आल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com