
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे होणारे मृत्यू, अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी झाल्यास द्यायच्या अर्थसाह्यात वाढ करण्यात आली आहे. व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्या वारसांना २५ लाख रुपये, व्यक्तीला गंभीर अपंगत्व आल्यास ७ लाख ५० हजार रुपये, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास ५ लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी खर्च देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय महसूल आणि वन विभागाने ३ ऑगस्ट रोजी निर्गमित केल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सध्याच्या आर्थिक तरतुदीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी व्यक्तीला द्यावयाची आर्थिक मदत त्या मानाने कमी असल्याबाबत तसेच त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. लोकप्रतिनिधींकडून आर्थिक साहाय्यामध्ये वाढ करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जखमी होऊन खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये ५० हजार प्रति व्यक्ती, अशी राहील. तथापि शक्यतो औषधोपचार शासकीय किंवा जिल्हा रुग्णालयात करावे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणाऱ्या रकमेपैकी रुपये १० लाख देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाद्वारे आणि उर्वरित रक्कम रुपये १० लाख पाच वर्षांकरिता मुदत ठेव म्हणून ठेवावे. उर्वरित पाच लाख रुपये १० वर्षाकरिता मुदत ठेवीत ठेवावेत. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.