...तर गोदावरीत 24 तास स्वच्छ पाणी

...तर गोदावरीत 24 तास स्वच्छ पाणी

नाशिक | फारूक पठाण | Nashik

महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ (Dream Project) असलेल्या ‘नमामि गोदा’ (Namami Goda) प्रकल्पाला केंद्राने (Central Government) 1823 कोटींच्या निधीला तत्वत: मंजुरी दिली आहे...

केंद्राकडून मनपा आयुक्तांना पत्र देखील पाठविण्यात आले असून लवकरच याबाबतचा सविस्तर आराखडा सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास गोदावरी प्रदूषणमुक्त होऊन 24 तास स्वच्छ पाणी यात वाहत राहील...

‘नमामि गंगे’च्या धर्तीवर दक्षिणेची गंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदावरी नदीच्या (Godavari River) पुनरूज्जीवनासाठी सत्ताधारी भाजपने (BJP) हाती घेतलेल्या 1823 कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी ‘नमामी गोदा’ प्रकल्पाला केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंग शेखावत (Gajendrasing Shekhawat) यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.

त्याचप्रमाणे या प्रकल्पाबाबत सविस्तर अहवाल (DPR) सादर करण्याचे आदेश शेखावत यांनी महापालिकेला दिले असून यासंदर्भातील पत्र जलमंत्रालयातर्फे नाशिक महापालिका (Nashik NMC) आणि राज्य शासनाला पाठविण्यात आले आहे.

ऑगस्ट 2021 च्या पहिल्या आठवड्यात महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील भाजप पदाधिकारी तसेच महापालिकेतील अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीवारी केली होती.

नाशिक शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. गुलशनाबाद ते नाशिक असा मोठा प्रवास आहे. तर मागील काही वर्षांत अत्यंत झपाट्याने नाशिक शहराचा मोठा विकास झाला आहे.

गोदावरीच्या किनारी सांस्कृतिक, ऐतिहासिक, पौराणिक, औद्योगिक तसेच कृषी यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या नाशिक भौगोलिकदृष्ट्या मुंबई, पुणे, व औरंगाबाद या औद्योगिक व वेगाने विकसित होणार्‍या ‘गोल्डन स्क्वेअर’मध्ये (Golden Square) आहे.

महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीची मोठी लांबी असून या गोदावरी नदीच्या काठी भारतातील अनेक खेडी, शहरे व काही राज्ये वसलेली आहेत. गोदेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी केला जातो. गोदावरी खोरे राज्यामधील प्रथम क्रमांकाचे खोरे आहे.

नाशिक महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळात शहर, औद्योगिक वसाहती व खेड्यांचा समावेश आहे. गोदावरी नदीकिनारी वसलेल्या नागरी वसाहतीमधून निर्माण होणार्‍या सांडपाण्यापासून सर्वाधिक प्रदूषण होते. पावसाळ्यानंतर नदीचा प्रवाह रोडावलेला असल्यामुळे त्याचा वेग मंदावतो.

त्यामुळे नैसिर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने खालावते. गोदावरी नदीतील पाणी ऋतूमानाप्रमाणे कमी, अधिक असते. पावसामुळे वाहणारे पाणी जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांत वाहून जाते. त्यामुळे नदीपात्रातील उर्वरित पाणी कुपोषित व आरोग्यास घातक असल्यामुळे डासांची पैदास तसेच दुर्गंधी पसरते.

त्यामुळे गोदावरी पात्राचे परिणामकारकरितीने मलनिःसारण करणे तसेच नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक असलेले गोदावरी व तिच्या उपनद्या नंदिनी (नासर्डी), वाघाडी, वालदेवी, कपिला तसेच शहरातील विविध परिसरातून वाहणार्‍या नाल्यांमुळे होणारे प्रदूषण, मलजलाची विल्हेवाट करताना दूषित जलस्रोताला नैसर्गिक जलस्रोताशी अनुकूल करणे, त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांपासून निर्माण होणारा रासायनिक कचरा किंवा प्रक्रिया केलेला घातक द्रव पदार्थ नदीच्या जलधारेला प्रदूषित करते.

या सर्व पाणी प्रदूषित करणार्‍या घटकांवर आवश्यक त्या उपाययोजन ‘नमामी गंगे’च्या माध्यमातून होणार आहे. तसेच भूपृष्ठपवरील दूषित व घाण पाणी, जलधौत संडासातील, शौचकुपी अथवा मूत्री यांचे पाणी त्याचप्रमाणे नदीनाल्यांच्या प्रवाहाबरोबर वाहून येणारे माती, शेण, लिद अशा घटकांमुळे दूषित होणारे पाणी नदीपात्रात जाण्यापासून रोखण्यात येऊन नदी, नाले दूषित होऊ नये म्हणून हे क्षेत्र संरक्षित करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे पाण्याचे शुद्धीकरण बंधनकारक असून आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. नाशिक शहर हे केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ ट्युरिझम (ministry of tourism) या खात्याच्या महत्त्वाकांक्षी स्वदेश दर्शनअंतर्गत रामायण सीटी या महत्त्वाकांक्षी योजनेत अंतर्भूत असून येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

आजमितीस नाशिक शहराची लोकसंख्या लक्षात घेता व दररोज सुमारे एक लाख यात्रेकरुंची अस्थायी लोकसंख्या असते. नाशिक शहराला अनादी काळापासून पौराणिक इतिहास असल्यामुळे येथे अनेक पवित्र स्थळे आहेत. या स्थळांना भेट देण्यासाठी जगभरातून भाविक व पर्यटक येत असतात.

त्यामुळे या शहराचे पौराणिक, आर्थिक औद्यगिक व परंपरागत महत्त्व लक्षात घेता गोदावरी व तिच्या उपनद्या व पावसाळी नाल्यातील जलस्रोत्र तांत्रिक प्रक्रियेद्वारे मलजल व सांडपाणी मलनिःसारण केंद्राकडे वळवणे, सिव्हर लाईनचे जाळे निर्माण करणे, अस्तित्वातील इंटरसेप्टींग व ट्रंक सिवर लाईनची दुरुस्ती व नवीन मलनि:सारण केंद्र उभारणे, त्याद्वारे गोदावरी व तिच्या उपनद्या स्वच्छ व संरक्षित करण्याचा प्रकल्प आहे.

पर्यावरण संतुलन राखणे व जैविक विविधता असलेल्या घटकांचे संरक्षण व जतन करणे. गोदावरी व तिच्या उपनद्या आरोग्यपूर्ण ठेवून त्या जलस्रोत्राचे नवचैतन्य, टवटवीतपणा निर्माण करणे, पर्यावरण शास्त्राच्या दृष्टिकोनातून सशक्त अशा व्यवस्थापकीय यंत्रणेद्वारे नदी पात्राचे सत्व-तत्व सांभाळणे, ओघवत्या प्रवाहाचे जतन करणे आदी कामे या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com