
बीड Beed।
राज्यासह देशभरामध्ये होळीचा (Holi) सण साजरा केला जात आहे. मात्र, याच होळीच्या सणाला बीडमधील गावातून 200 जावई (sons-in-law) गायब (disappear) झाले आहेत. बीड जिल्ह्यात धुळवडीला (Dhulwad) जावई चक्क गाढवावर (donkey) बसतो. तसेच त्याची गावभर मिरवणूकही निघते. ही परंपरा नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात.
ही अनोखी परंपरा बीडच्या विडा गावातली आहे. धुळवडीच्या दिवशी याठिकाणी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. या भीतीमुळे गावातील तब्बल 200 जावई भूमिगत झाले आहेत. त्यांचा कुठेच ठावठिकाणा लागत नाही आहे. पण जावई शेर तर गावकरी सव्वाशेर आहेत. जावयाच्या शोधासाठी गावाने ‘जावई शोध समिती’ स्थापन केली आहे. त्यामुळे कोणत्या जावयांची गर्दभ सवारी निघणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काय आहे ही परपंरा -
परंपरा कायम ठेवण्यासाठी धुळवडीच्या दोन दिवस अगोदर गावातील तरुण एकत्र येतात आणि जावई शोध समिती नेमतात. एका जावयाला ताब्यात घेऊन धुळवडीपर्यंत निगरानीखाली ठेवले जाते. तसेच धुळवडीच्या दिवशी त्यांची मिरवणूक गर्दभ महोदयांवर बसून मिरवणूक काढली जाते. पण ही मिरवणूक जावयांसाठी जितकी भीतीदायक आहे तितकीच जॅकपॉट लावणारी सुद्धा आहे.
धुळवडीच्या दिवशी सकाळी ग्रामपंचायतीसमोर गाढव आणला जातो. त्याला चपलेचा हार घातला की मिरवणुकीला सुरू होते. गावातील प्रमुख रस्त्यांवरून दुपारपर्यंत मिरवणूक हनुमान मंदिरासमोर पोहोचते. या ठिकाणी जॅकपॉट लागतो. पहिले म्हणजे लोकवर्गणीतून जमलेल्या पैशांतून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर गावातील प्रतिष्ठितांच्या हस्ते जावयाला दिला जातो. आणि दुसरे म्हणजे, जावईबापूला सासर्याच्या ऐपतीनुसार सोन्याची अंगठीसुद्धा भेट दिली जाते.
पण हे सगळं कितीही सुखावणारे असले तरी जावई फरार होतात. कारण गाढवावरून गावभर सवारी करणार कोण, असा प्रश्न जावयाच्या मनात असतो. ग्रामस्थ मिरवणुक काढण्यासाठी जावयांचा शोध घेत असून गावातील जावई गायब झाल्याने गाढवावर बसविण्यासाठी जावायांचा शोध घेण्यात येत आहे.