प्रतिनिधी । दिंडोरी
पावणे चारवर्षीय बालिकेला काहीतरी खाण्याचे आमिष दाखवून अतिप्रसंग केल्या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या एका प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला दोषी ठरवून वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
गेल्या वर्षी जून २०२२ मध्ये जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एका शेतात मजुरी काम करणाऱ्या संशयित पवन लहू महाले (१८) याने पीडित बलिकेला चिंचा खाऊ घालण्याच्या बहाण्याने घराजवळच असलेल्या शेतात नेत तिच्याशी अंगलट करत अतिप्रसंग केला होता. घटनेनंतर पीडित बालिकेने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस ठाण्यात महाले याच्याविरुद्ध बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराध कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा दिंडोरी पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर करीत न्यायालयात खटला दाखल केला होता. अवघ्या वर्षभरापूर्वी घडलेल्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. घुले (न्यायालय ५ वे) यांनी गुन्ह्यात नराधम आरोपी महाले याला या प्रकरणात दोषी ठरवून वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच ५० हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकारी अभियोग्यता म्हणून श्रीमती लीना चव्हाण यांनी काम बघितले तर या गुन्ह्याचा तपास दिंडोरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय कवटे यांनी केला. पैरवी म्हणून संगीता राठोड यांनी काम बघितले.