<p>मुंबईतील लालबाग परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत २० जण होरपळून जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे</p>.<p>मुंबईच्या लालबाग इथं साराभाई इमारतीतील बंद खोलीत गॅस बाटल्याचा स्फोट झाला. या भीषण स्फोटामध्ये तब्बल २० स्थानिक नागरिक जखमी झाले असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली असून, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.हा स्फोट नक्की कसा झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. </p><p>जखमींना केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.</p><p>मागील काही दिवसांपासून स्फोट झालेल्या खोलीमध्ये गॅस लीकेजचा वास येत होता. रविवारी सकाळी वास कुठून येतोय हे पाहण्यासाठी स्थानिक नागरिक शोध घेत गेले असता अचानक स्फोट झाला. या भयंकर स्फोटात परिसरातील तब्बल २० जण आगीत होरपळून जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.</p>