१९४ ग्रामपंचायतींना मिळणार उपसरपंच

सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होणार पहिली सभा
१९४ ग्रामपंचायतींना मिळणार उपसरपंच

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नूतन सरपंचाच्या अध्यक्षतेखील पहिली सभानाशिक: इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर ग्रामपंचायतींना नवे गाव कारभारी मिळाले आहेत. निवडणूक झालेल्या १९४ ग्रामपंचायतीचे सरपंच हे थेट जनतेतून निवडून आलेले असून आता उपसरपंच निवडीची सरपंचांच्या अध्यक्षतेखाली येत्या १ नोव्हेंबर पहिली सभा होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या ( State Election Commission ) आदेशानुसार जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमधील १९४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला होता. त्यामध्ये सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वतरित १८७ ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबर रोजी थेट सरपंच आणि सदस्य पदांसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीचा निकाल जाहिर होऊन ग्रामपंचायतींमध्ये नवे लोकप्रतिनिधी विराजमान झाले आहेत.

या सर्व ग्रामपंचायतींमध्ये लोकनियुक्त सदस्य आणि सरपंच विराजमान झाल्यानंतर आता उपसरपंच पदासाठी येत्या १ नोव्हेंबर रोजी नूतन सरपंचाच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. उपसरपंच निवडणुकीच्या या पहिल्या सभेसाठीची नोटीस प्रत्येक सदस्याला तीन दिवस आगोदरच पाठविण्याची व्यवस्था करण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. निवडणूक निरिक्षक म्हणून गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती जाहिर करण्यात आलेली आहे.

यंदा सरपंच आणि सदस्य थेट जनतेतून निवडून आले आहेत मात्र उपसरपंच नवनियुक्त सदस्यांना निवडून दयावा लागणार आहे. या प्रक्रीयेमुळे राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. सरपंचपदाची संधी हुकल्याने आपल्याच पॅनलच्या सदस्याची उपसंरचपदी वर्णी लागावी यासाठी रस्सीखेच होणार असल्याने अनेकांचे राजकीय वर्चस्व पणाला लागणार आहे. निवडणुकीतील तडजोडीनुसार अनेक ठिकाणी उपसरपंच देखील बिनविरोध करण्यासाठीची रणनिती आखण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर येथील मुदत संपुष्टात आलेल्या १९४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. सात ग्रामपंचायतींसह १८ सरपंच बिनविरोध झाल्याने उर्वरित १८७ ग्रामपंचायतींसाठी गेल्या १६ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. १७ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहिर करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com