'अब हर देश में तिरंगा'...; कझाकस्तानमध्ये एकाच वेळी झाले नाशिकचे १९ 'आयर्नमॅन'

'अब हर देश में तिरंगा'...; कझाकस्तानमध्ये एकाच वेळी झाले नाशिकचे १९ 'आयर्नमॅन'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणजे ‘आयर्न मॅन’ स्पर्धा (iron man competition). नूर सुलतान, कझाकस्तानमध्ये ही स्पर्धा नुकतीच पार पडली. यात नाशिकच्या तब्बल १९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला....

एक दोन नव्हे तर सर्वच्या सर्व स्पर्धकांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या तीन खेळाडूंनी आर्यनमॅन स्पर्धेवर कब्जा करण्याची हॅट्रिक केली आहे तर स्पर्धेतील एका पितापुत्रांनी एकाच स्पर्धेत भाग घेत ती यशस्वी पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला आहे. यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहें. ३.८ किमी स्विमिंग, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते.

हे ठरले ‘आयर्न मॅन’चे मानकरी

कझाकस्तानमध्ये पार पडलेल्या स्पधेत डॉ. वैभव पाटील, डॉ. पंकज भदाणे, डॉ. दुष्यंत चोरडिया, डॉ. देविका पाटील, डॉ. अरुण गचाले, किशोर काळे, माणिक निकम, अनिकेत झवर, प्रशांत डाबरी, अश्विनी देवरे, निलेश झवर, नीता नारंग, आविष्कार गचाले, निसर्ग भामरे, अरुण पालवे, महेंद्र छोरिया, किशोर घुमरे, विजय काकड, धीरज पवार आदी आयर्नमॅन स्पर्धेचे मानकरी ठरले.

पितापुत्रांचे होतेय कौतुक

नाशिकचे डॉ. अरुण गचाले यांनी त्यांच्या १७ वर्षीय मुलगा आविष्कार सोबत या स्पर्धत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या दोघांनी स्पर्धेत साहसी कामगिरी करत स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. आयर्नमॅनसारखी अवघड स्पर्धा पूर्ण करणारे हे पहिलेच पितापुत्र ठरले, असे समजते.

तीन खेळाडूंची हॅट्रिक

प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले यांनी सलग तीन वेळेस आयर्नमॅन स्पर्धेवर कब्जा केला आहे. या तिघांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, हा इव्हेंट अत्यंत चांगला आयोजित करण्यात आला होता. हवेचा वेग जास्त असल्यामुळे सायकलिंग करणे कठीण गेले. कझाकस्तानमध्ये स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय दूतावासाने आम्हाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहणाचा मान दिला. त्यामुळे आम्ही भारतीय दूतावासाचे आभार व्यक्त करतो, अशा प्रतिक्रिया स्पर्धकांनी व्यक्त केल्या.

आता हर देश में तिरंगा फडकावण्याचे आमचे लक्ष आहे. कझाकस्तानच्या स्पर्धेचे विशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत जगभरातून १८ ते २५ वयोगटात ७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात दोन स्पर्धक नाशिकचे होते. नागरिक आता आयर्नमॅन स्पर्धेकडे आकर्षित होत आहेत. आता ऑलिम्पिकमध्येही ट्रायथलॉनचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच नाशिकमध्ये आम्ही ट्रायथलॉन अकादमी सुरु करणार आहोत. जेणेकरून आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळेल. तसेच अल्ट्रामॅन स्पर्धा हे माझे पुढील लक्ष आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी आता तयारीला लागलो आहे.

महेंद्र छोरीया - आयर्नमॅन

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com