
निफाड | प्रतिनिधी Niphad
पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे शहाजी उमाप यांनी स्वीकारल्यानंतर कायदा - सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य दिले जात आहे. आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता उपद्रवी, अवैध दारु विक्री करणाऱ्या १२ जणांना भेंडाळी व औरंगपूर परिसरातून तीन दिवसांसाठी हद्दपार केले आहे.
पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड उपविभागीय दंडाधिकार्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) प्रमाणे १३/०४/२०२३ रात्री १० ते १५/०४/२३ च्या सकाळी आठपर्यंत गाव व परिसरात प्रवेश न करण्यास, राहण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने या १२ व्यक्तींच्या उपस्थितीने गाव व परिसरात कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी खात्री झाल्याने उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) प्रमाणे एकतर्फी आदेश ११ एप्रिलला रोजी पारित केला आहे.
यामध्ये भेंडाळीचे पोलीस पाटील सोमनाथ गोंविद वाजे(भेंडाळी, औरंगपूर व परिसर), अतिश सोमनाथ वाजे (रा.भेंडाळी), रवींद्र श्यामराव कापसे (रा. तामसवाडी व परिसर), सचिन भाऊसाहेब माने (बागलवाडी व परिसर), दत्तात्रय रामनाथ आव्हाड (म्हाळसाकोरे व परिसर), तुषार बाबुराव ससाणे (औरंगपूर व परिसर), विश्वनाथ त्र्यंबक खालकर (सोनगाव व परिसर), विशाल छबू क्षीरसागर (रा.तारुखेडले व परिसर), देविदास वसंत जगताप (तारुखेडले व परिसर), नितीन पांडुरंग झाडे (बागलवाडी व परिसर), मुस्ताक हुसेन शेख (रा.;सायखेडा, ता. निफाड) यांच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
हद्दपार झालेल्या व्यक्तींनी गाव व परिसरात प्रवेश करण्यास, थांबण्यास १३ ते १५ एप्रिलपर्यंत बंदी असून, सदर लोक संबंधित परिसरात आढळून आल्यास सायखेडा पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
- पी.वाय.कादरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायखेडा