Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यासिटीलिंक सुस्साट! तीन महिन्यांत १२ लाख नाशिककरांचा प्रवास

सिटीलिंक सुस्साट! तीन महिन्यांत १२ लाख नाशिककरांचा प्रवास

नाशिक | फारूक पठाण | Nashik

दि. ८ जुलै २०२१ पासून सुरू झालेल्या नाशिक महापालिकेच्या शहर बस सेवेला (Nashik NMC Bus) उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत बारा लाख प्रवाशांनी शहर बस सेवेचा लाभ घेतला आहे…

- Advertisement -

यातून महापालिकेला अडीच कोटी रुपयांचा महसूल (Revenue) मिळाला आहे. दि. ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर विशेष नियोजन केले जाणार आहे.

सिटी लिंकद्वारे (Citilinc) चालणार्‍या बस सेवेचे तिकीट ॲपद्वारेदेखील मिळते. यामुळे आतापर्यंत हजारो जणांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. सुरुवातीला कमी बसेस सुरू करण्यात येऊन आता टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होत आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Corona Second Wave) लॉकडाऊनची (Lockdown) परिस्थिती होती. यामुळे बस सेवेलादेखील अल्प प्रतिसाद मिळाला. लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर धावणाऱ्या बसची संख्यादेखील कमी करण्यात आली होती.

आता करोना रुग्ण संख्या बऱ्यापैकी कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहे. त्यामुळे सध्या ६९ बसेस शहरातील विविध मार्गांवर धावत आहे. यात ४५ बसेस डिझेलच्या असून २४ बसेस सीएनजीवर (CNG Bus) चालत आहे. टप्प्याटप्प्याने एकूण २५० बसेस नाशिककरांच्या सेवेत लवकरात लवकर दाखल होणार आहे.

अत्यंत आधुनिक पध्दतीने सिटीलिंक कंपनीचे काम सुरू आहे. दर ३० सेकंदात शहरात फिरत असलेल्या एकूण बसेसची बारीक-सारीक माहिती या सिटीलिंकच्या कंट्रोलरुममध्ये उपलब्ध होत असते.

बस सेवेची सुरूवात झाली त्या वेळी ८ रुपये प्रतिकिमीप्रमाणे कमाई सुरू झाली होती, ती ५० रुपयांपर्यंत नेण्यात येणार आहे. ज्यावेळी सेवा सुरू झाली त्यावेळी लॉकडाऊनचा काळ होता. दुपारी चारपर्यंत बाजार सुरू होते, तर शनिवार व रविवार बंद होता. यामुळे कमाई कमी झाली.

आता रात्री उशिरापर्यंत बाजार सुरू झाल्याने बसच्या उत्पन्नात देखील हळूहळू वाढ होत आहे. त्र्यंबक रोडवरील तरणतलाव समोर सिटीलिंकचे कार्यालय आहे. या ठिकाणी असलेल्या कंट्रोल रुमद्वारे नाशिकमध्ये धावणार्‍या बसेसचे संचालन करण्यात येते.

यासाठी विशेष तांत्रिक पथक सतत कार्यरत आहे. पहाटे ५ वाजेपासून बसच्या फेर्‍या सुरू होतात, तर रात्री दहा वाजेपर्यंत सतत फेऱ्या सुरू असतात. ज्या मार्गावर जास्त उत्पन्न मिळते त्या मार्गावर दर २० मिनिटाला बस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्रवाशाने तिकीट काढले तर लगेच त्याचा हिशोब केंट्रोल रुममध्ये असलेल्या पडद्यावर येतो. त्याचप्रमाणे चालकाने त्यांना ठरवून दिलेल्या मार्गात बदल केला किंवा एखाद्या थांब्यावर गाडी थांबली नाही तरी त्वरीत या कंट्रोल रुममध्ये त्याची माहिती मिळते. यामुळे त्वरीत मुख्यालयातून संबधितांना सुचना देण्यात येते.

तीन चालक, आठ कंडक्टरांवर कारवाई

नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक कंपनीच्या माध्यमातून बस सेवा अत्यंत शिस्तीत सुरू आहे. तर संपूर्ण नियंत्रण कंट्रोल रूमद्वारे केले जाते. यामुळे काही जरी गडबड झाली तर त्वरीत कारवाई करण्यात येते. प्रवाशाला तिकीट न देता पैसे घेणार्‍या एकूण 8 कंडक्टरांवर तर कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल ३ चालकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या