Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यादुबार नोंदणीचे १० लाख मतदार वगळले

दुबार नोंदणीचे १० लाख मतदार वगळले

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

भारत निवडणूक आयोगाने ( Election Commission of India )घोषित केलेल्या मतदार पुनरिक्षण ( Voter Audit )कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० लाख ५६ हजार मतदार कमी झाले आहेत. तर दिव्यांग मतदारांत १५ हजारांनी वाढ झाली आहे. दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे, मृत्यूमुखी पडलेले आणि छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याबाबत निवडणूक आयोगाने विशेष कार्यक्रम घोषित केला होता. त्याअंतर्गत १० लाख मतदार कमी झाल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

- Advertisement -

अद्ययावत मतदार यादीसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना देशपांडे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने ऑगस्ट २२ ते नोव्हेंबर २२ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता. यात मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरण, दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे, मृत्यूमुखी पडलेल्या मतदारांची नावे वगळणे तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र घेऊन ते सुधारित करण्याचे काम करण्यात आले. सोबतच १८ वर्षे पूर्ण केलेले युवा मतदार, दिव्यांग, महिला, देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय व्यक्ती, दुर्गम आणि आदिवासी भागातील तसेच विमुक्त भटक्या जमातीतील व्यक्तींची नोंदणीही करण्यात आली.

राज्यात गेल्या वर्षी जानेवारीत ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. मात्र, दुबार, छायाचित्र नसलेले आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची संख्या ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ इतकी झाली आहे. त्यामुळे १० लाख ५६ हजार इतके मतदार गेल्या वर्षीपेक्षा कमी झाले आहेत. त्यात यंदा नव्याने ४ लाख ४३ हजार ५०० मतदारांची नोंदणी करण्यात निवडणूक आयोगाला यश मिळाले आहे. राज्यात गेल्या वर्षी ६ लाख ६२ हजार १५१ दिव्यांग मतदारांची नोंदणी होती, त्यात यंदा १५ हजार ३३२ ने वाढ झाली आहे. तर मतदान ओळखपत्रावर छायाचित्र नसल्याने ६ हजार २५७ मतदारांची नावे वगळण्यात आली. तसेच २ हजारांहून अधिक मतदारांचे छायाचित्र टाकण्यात यश मिळवल्याचे निवडणूक आयोगाने सादर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट होते.

मागील वर्षभरात १८ ते १९ या वयोगटातील नवतरूण मतदारांच्या संख्येत ६६ लाख ७ हजार २५० मतदारांची नोंदणी झाली आहे. तर २० ते २९ वयोगटातील १ कोटी ६२ लाख २० हजार ५२४ इतक्या नवमतदारांची नोंद झाली असून ही वाढ १२.८४ टक्के इतकी आहे. विधानसभा मतदारसंघातील मतदार यादींमध्ये दुबार नावे आणि मृत पावलेल्या व्यक्तींची नावे तसेच एका मतदारसंघात आणि दुसऱ्या मतदारसंघातही सारखीच नावे असणारी २९ लाख नावे आढळून आली असून ही नावे पुन्हा एकदा तपासून काढून टाकण्यात येणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

अंतिम मतदार यादीनुसार राज्यातील मतदार संख्या

पुरूष : ४ कोटी ७१ लाख ३५ हजार ९९९

महिला : ४ कोटी ३१ लाख ४५ हजार ६७

तृतीयपंथी : ४ हजार ७३५

एकूण मतदार : ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१

- Advertisment -

ताज्या बातम्या