सार्वजनिक स्तरावर ‘गोबरधन’ची अंमलबजावणी - बनसोड

योजनेसाठी अंदरसूलची निवड
सार्वजनिक स्तरावर ‘गोबरधन’ची अंमलबजावणी - बनसोड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 (Swachha Bharat Abhiyan Phase 2)अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने 'गोबरधन योजना'( Gobardhan Yojana ) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल ( Andarsul )गावाची निवड करण्यात आली असून, या गावात सार्वजनिक स्तरावर गोबरधन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.

जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छतेच्या विविध घटकांवर काम करण्यात येत आहेत. प्रायोगिक तत्वावर प्रत्येक जिल्हयात एका गावामध्ये गोबरधन प्रकल्प राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. गोबरधन योजनेत प्रामुख्याने ग्रामपंचायतीमधील शेती कचरा, सेंद्रीय कचरा, गुरांचा कचरा, गोशाळा यापासून घरगुती वापरासाठी गॅसची निर्मिती करावयाची आहे. तसेच या गॅसचा वापर गावातील कुटुंब, शाळा, अंगणवाडी इ. ठिकाणी करावयाचा आहे. तसेच यापासून स्लरीचा उपयोग शेतीसाठी खत म्हणून करावयाचा आहे.

जनावरांची संख्या, लोकसंख्या, शेतीमध्ये निर्माण होणारा कचरा या निकषावर गोबरधन प्रकल्पासाठी येवला तालुक्यातील अंदरसूल गावाची निवड करण्यात आली असून राज्यस्तरावरुन नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक संस्थेकडून गावाचे सर्वेक्षण, आराखडा, अंदाजपत्रक इ. काम पूर्ण करण्यात आले. यानंतर या कामाचे ई टेंडर करण्यात आले होते. यामध्ये पात्र ठरलेल्या संस्थेला 24 ऑगस्ट 2022 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्हयातील हा पहिलाच प्रकल्प असून हा प्रकल्प सहा महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून 50 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावकर्‍यांचे जीवनमान सुधारण्यासाठी गुरांचा कचरा, स्वयंपाकघरातील उरलेला कचरा, पिकांचे अवशेष आणि बाजारातील कचरा यांसह जैव-कचर्‍याचे रुपांतर करून गावांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी गोबरधन योजना राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणि कुटुंबांना आर्थिक आणि संसाधन फायदे देण्याचे उददीष्ट आहे. खेड्यांमध्ये चांगली स्वच्छता आणि सुधारित आरोग्य याद्वारे या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना आणि विशेषतः महिलांना होणार असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे काम करण्यात येत असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.

घनकचरा व्यवस्थापन :- ग्रामीण भागातील जनतेचे उत्पन्न व रोजगार वाढविणे आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी करणे, हा गोबरधन योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. याच बरोबर खालील घटकांच्या अनुषंगानेही चांगला परिणाम होणे अपेक्षित आहे.

स्वच्छता :- गावातील कचरा कमी करून, गावाच्या स्वच्छतेचा स्तर उंचावणे.

सेंद्रिय खत :- बायोगॅस प्रकल्पातील शिल्लक स्लरी हे उच्च दर्जाची खत रासायनिक खताला पर्याय म्हणून उपलब्ध करून देणे.

आरोग्य :- साचलेल्या कच-याची विल्हेवाट लावून, मलेरीया व अस्वछतेपासून निर्माण होणा-या रोगांचे निर्मूलन करणे व शेणाच्या गव-या व लाकडांच्या जाळण्यामुळे होणा-या धुरापासून हवेचे प्रदुषण कमी करणे तसेच स्वयंपाकासाठी लागणार्‍या लाकडाची वृक्षतोड थांबविणे.

ऊर्जा :-गावातील जैविक कचर्‍याद्वारे स्वच्छ ऊर्जा निर्माण करून गावक-यांचे आत्मविश्वास उंचावणे व वृक्षतोड कमी करणे.

रोजगार :- गावातील कचरा गोळा करून, बायोगॅस प्लान्टपर्यंत वाहून नेणे, प्लान्ट व्यवस्थापन, प्लान्टंची दैनंदिन देखभाल दुरूस्ती, बायोगॅस तथा निर्मित बायोस्तरीची विक्री व वितरण या माध्यमातून स्थानिक युवक व अर्धकुशल कामगारांना रोजगार उपलब्धता.

सशक्तीकरण :- स्वयंपाकासाठी स्वच्छ व स्वस्त बायोगॅस पुरवठा करणे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com