Z P CEO Leena Bansod
Z P CEO Leena Bansod
मुख्य बातम्या

प्रत्येक ग्रामपंचायतींनी करोना संकटात आपला सहभाग वाढवावा- सीईओ बनसोड

बागलाण, देवळा व नाशिक तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी संवाद

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

बागलाण, देवळा व नाशिक तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सोमवारी (दि.२२) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या संवादात बनसोड यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. करोना संकटात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेत, प्रत्येक ग्रामपंचायतींनी करोना संकटात आपला सहभाग वाढवावा , असे आवाहन बनसोड यांनी यावेळी केले.

बनसोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा स्वीकारल्यानंतर तालुकानिहाय बैठका घेत आढावा घेतला होता. त्यानंतर तालुकानिहाय ग्रामसेवक, सरपंच यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे नियोजन होते. परंतू , करोनाचा संसर्ग झाल्याने लॉकडाऊन झाले. यात बनसोड यांच्यावर ग्रामीणमधील करोनाची जबाबदारी आली. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक यांचा आढावा बैठका लांबणीवर पडल्या. मात्र, बनसोड यांनी लांबणीवर पडलेल्या या बैठका घेण्याचा निर्णय घेतला.

करोना प्रादुर्भावामुळे गावांमध्ये जाणे शक्य नसल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बनसोड यांनी नाशिक, बागलाण व देवळा तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी सोमवारी संवाद साधला. यात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, यांसह त्या-त्या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती, सदस्य यांनाही सहभागी करून घेतले. १४ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी, १५ व्या वित्त आयोगाचा वार्षिक कृषी आराखडा, जनसुविधा, मुलभूत सुविधा कामे, नरेगाची अपूर्ण कामे, नळ जोडणी, पावसाळयात करावयाच्या उपाययोजना, कुपोषण, खते, बि-बियाणे आदी विषयांवर त्यांनी माहिती घेतली. अखर्चित निधी वेळात खर्च करावा, कामे वेळात पूर्ण करावी, वार्षिक आराखडा तात्काळ सादर करावा,अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पावसाळयाचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात साथीचे रोग पसरू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी बनसोड यांनी दिले. यावेळी सरपंच, ग्रामसेवक यांनी आपल्या तक्रारी मांडल्या. ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन, कोरोना आजाराबाबत ग्रामपंचायतींकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा बनसोड यांनी यावेळी घेतला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामपंचायतींनी सतर्क राहावे, कोरोना संकटात ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन, तपासणी, सर्व्हेक्षण कामात पुढाकार घेण्याचे आवाहन बनसोड यांनी ग्रामसेवक, सरपंच यांना केले. दररोज तीन याप्रमाणे १५ तालुक्यांतील सरपंच, ग्रामसेवकांसह लोकप्रतिनिधींशी व्हीसीव्दारे बनसोड आठवडाभरात सवांद साधणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com