Photo Gallery : रामसृष्टी उद्यान आणि तपोवन पर्यटन हब होण्याच्या प्रतीक्षेत

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

पंचवटीचे धार्मिकदृष्ट्या महत्व असल्याने देश विदेशातील भाविक पर्यटक मोठ्या संख्येने येतात. तपोवन…गोदा-कपिला संगम, श्रीराम-सीता मातेची झोपडी, शूर्पनखेचे नाक कापल्याच्या अख्यायिकेचे स्थळ, राम-लक्ष्मण मंदिर अशी कितीतरी शक्तीस्थळे भाविकांप्रमाणेच पर्यटकांना खेचून आणतात  या परिसराचे पौराणिक महत्त्व अधिक असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने रामसृष्टी उद्यान व तपोवन पर्यटन हब व्हावे या हेतूने दूरदृष्टी प्रयत्न करावे अशी  मागणी पंचवटी युवक समितीच्या वतीने नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली.

तपोवनात असलेल्या नदी पत्रात कायम वाहते पाणी राहील ,नदी पात्रात सोडलेले गटारीचे पाणी बंद करावे जेणेकरून दुर्गंधी कमी होईल. तपोवन परिसरातील  पात्राजवळ मुंबईच्या धर्तीवर चौपाटी विकसित करावी जेणेकरून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल व पर्यटक देखील याठिकाणी रममाण होतील शिवाय याठिकाणी राम मंदिर ते तपोवन रामायणाची महती देणारी चित्रफित दाखवण्याची व्यवस्था रामसृष्टी उद्यानांत करावी जेणेकरून भाविक आकर्षित होतील. शिवाय त्यांना तापोवनाची महती जाणून घेण्यास मदत करेल शिवाय  तापोवानाचे एक वेगळेपण पर्यटकांना अनुभवण्यास मिळेल.

यासोबत मनपा प्रशासनाने तपोवनाच्या प्रवेशद्वारावर कमान उभी करावी शिवाय महामार्गावर तपोवनाच्या प्रवेशाच्या जवळ असलेलेया वाहतूक बेटांची दुरुस्ती करावी, प्रत्येक ठिकाणी तीन भाषांमध्ये पर्यटकांना माहिती देणारे मार्गदर्शक फलक लावावे, कायस्वरूपी स्वच्छता कर्मचारी यांची नेमणूक करावी अशी मागणी  करतांना आज तापोवनात अस्वच्छता, दुर्गंधी, असुरक्षितता आणि गोदावरीची झालेली गटार गंगा यामुळे परिस्थिती अतिशय दयनीय आहे.

याठिकाणी मनपाने कोट्यावधी रुपये खर्च करून रामसृष्टी उद्यान साकारले होते.रामसृष्टी उद्यानात विविध झाडे, कारंजे, तसेच रामायणातील निवडक प्रसंगाच्या दर्शन घडविणारे शिल्पदेखील बसविण्यात आले आहे. कुंभमेळ्यात या ठिकाणी आलेल्या पर्यटकांनी या उद्यानाचे कौतुकदेखील केले हेाते.

मात्र मनपाने दुर्लक्ष केल्याने रामसृष्टी वनवासात सापडली असून या ठिकाणी सुरक्षारक्षकही नाही त्यामुळे टवाळखोरांची संख्या वाढत आहे, उद्यानात पडझड झाली आहे.

सर्वत्र घाण, दुर्गंधीमुळे पालिकेचे लाखो रुपये गेले पाण्यात आहे. वाढलेले गवत, शिल्पांची दुरावस्था, ऍम्पी थिएटरच्या उखडलेल्या फरशा, विजेच्या उघड्या पेट्या, टवाळखोर अन्‌ मध्यपीचे अड्डे, इथल्या इमारतीमधील गैरप्रकार हे साऱ्या उघड्या डोळ्यांनी पाहताना नाशिककरांना  संताप करण्याची वेळ आली आहे.

पर्यटनाला गती मिळावी आणि शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून महापालिकेतर्फे जवाहरलाल नेहरु पुनर्उत्थान योजनेतंर्गत पाच एकर जागेत रामसृष्टी उद्यान उभारण्यात आले. पर्यटनाचा नाशिककरांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण केला खरा पण अवस्था दयनीय झाली आहे.

देशभरातूनच नव्हे, तर सातासमुद्रापलिकडून येणाऱ्या भाविकांप्रमाणेच पर्यटकांची उद्यानाच्या दुरावस्थेवर नजर पडता क्षणी शहराची वाईट प्रतिमा तयार होते. उद्यानात दारुडे, गंजड्यांनी तांबा घेतलाय. वृक्षांखाली बिनदक्कपणे बिबत्स चाळे चाललेले असतात. त्यातच भर म्हणजे, कारंजा बंद पडलाय. झोपड्या बांधण्याकडे कानाडोळा केला गेला आहे.

उद्यानात सर्वच बाजूने प्रवेश करता येत असताना सुरक्षा रक्षक नसल्याने हे उद्यान गैरप्रकारांचे केंद्र बनले आहे.त्यामुळे शहराचे महत्व जतन व्हावे या हेतूने लक्ष द्यावे अशी मागणी पंचवटी युवक विकास समितीच्या वतीने केली आहे.

त्यावेळी पंचवटी युवक विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत, कार्याध्यक्ष किरण पानकर,उपाध्यक्ष धनंजय कोठुळे ,सरचिटणीस सचिन दप्तरे,खजिनदार अजित पाटील, चिटणीस संतोष जगताप,सहचिटणीस रोहित सानप,भाविक भिडे,वैजनाथ कड,प्रवीण जमदाडे ,सागर दवंडे यांच्यसह पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *