चांगली बातमी : नंदुरबार : करोनाबाधीत चारही रूग्णांनी करोनावर केली मात

jalgaon-digital
2 Min Read

नंदुरबार | प्रतिनिधी

जिल्हयातील पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णासह त्याच्या कुटूंबातील चारही सदस्यांनी कोरोनावर मात केली आहे. आज त्यांना जिल्हा रुग्णालयातून उपचाराअंती घरी सोडण्यात आले. यावेळी ७१ वर्षीय वृद्ध महिलेने त्यांची सेवा करणार्‍या डॉक्टर, नर्स यांच्याबाबत भावनात्मक उद्गार काढत कृतज्ञता व्यक्त केली.

जिल्ह्यात दि.१७ एप्रिल रोजी शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील एक जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटूंबातील इतर तीन सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे गेल्या वीस दिवसांपासून चौघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

पहिल्या रुग्णाचा दुसरा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मात्र त्याचा तिसरा आणि चौथा अहवाल निगेटीव्ह आला. त्याच्या कुटुंबातील इतर तिघांचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे चौघांना आज टाळ्यांच्या गजरात आणि फुलांची उधळण करीत घरी पाठविण्यात आले. जातांना प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, डॉ.के.डी.सातपुते, डॉ.राजेश वसावे, डॉ.नरेंद्र खेडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी जाफर तडवी, अधिपरिचाररिका निलीमा वळवी आणि जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सकाळपासूनच जिल्हा रुग्णालय परिसरात उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: परिचारिकांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. गेल्या वीस दिवसांपासून त्यांनी धैर्यपूर्वक केलेल्या उपचारामुळे जिल्ह्यातील पहिला रुग्ण बरा होऊन घरी परतला. डॉ.भोये, डॉ.सातपुते आणि त्यांच्या टीमने रुग्णांवर उत्तमरितीने उपचार केले. उपचारादरम्यान वृद्ध महिलेने जास्त विश्वासाने डॉक्टर आणि परिचारिकांना प्रतिसाद दिला. तसेच कुटुंबियांना धैर्य राखण्यास सांगितले.

आज चौघा रुग्णांना उत्साहात फुलांची उधळण करून निरोप देण्यात आला. फुलांची उधळण होत असताना वृद्ध आजींचे ‘हा बेटा हां, सबके लिए दूवा है मेरी, सबका अच्छा होगा’ हे समाधानाचे शब्द रुग्णालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी घेतलेले परिश्रम सार्थकी लावणारे होते. एका रुग्णवाहिकेतून चौघांना घरी पाठविण्यात आले.

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे. आजच्या घटनेमुळे या आजारातून बरे होता येते हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण होऊन मनातली भिती कमी होणार आहे. विश्वासाने आणि जिद्दीने उपचार करणार्‍या जिल्हा रुग्णालयाच्या टीमचा जिल्हावासियांना अभिमान आहे, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरीत रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *