Friday, April 26, 2024
Homeनगरनगरच्या रेल्वेपुलावर एसटी-ट्रकचा भीषण अपघात दोन ठार : 18 जखमी

नगरच्या रेल्वेपुलावर एसटी-ट्रकचा भीषण अपघात दोन ठार : 18 जखमी

संख्या वाढण्याची भीती : जखमींत कोपरगाव, नगर, जामखेडचे प्रवाशी

अहमदनगर (प्रतिनिधी)-  नगर-पुणे महामार्गावर गुरूवारी रात्री 8.30 च्या सुमारास एसटी महामंडळाची बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होऊन दोन जण ठार आणि दहाहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.धडक एवढी जोरदार होती की अपघातानंतर एसटी महामंडळाच्या बसची दिशा बदलली.

- Advertisement -

रात्री उशीरापर्यंत बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अपघातानंतर पुलावरून जाणारी एक दुचाकी देखील पुलाच्या खाली रहिवासी कॉलीनीत फेकली गेल्याने त्यात काही तरुण गंभीर जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातानंतर या महामार्गावर आणि अपघातस्थळी मोठी गर्दी उसळून वाहतूक कोंडी झाली. त्यातच परिसारातील वीज गायब झाली आणि गोंधळ उडाला. यामुळे जखमींसाठी मदत कार्य करतांना मोठी अडचण आली. जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयासह जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले.

गुरूवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास जामखेड-मुंबई एसटी बस क्रमांक एमएच 11 बी एल 9238 (जामखेड आगार) नगरच्या स्वस्तिक चौकातील बस स्थानकातून मुंबईच्या दिशेने निघाली. कायनेटीक चौक पार करून रेल्वे पुलावर येताच समोर पुण्याकडून नगरकडे येणारा दादा ट्रान्सपोर्टचा ट्रक एमएच 16 बीसी 1086 याने बसला समोरून धकड दिली.

या अपघातात प्राथमिक माहितीनूसार बसमधील दोन प्रवासी जागेवर ठार झाले असून बस शेजारून प्रवास करणार्‍या एक दुचाकी पुलाच्या खाली रहिवासी कॉलेनीत फेेकली गेली. यात काही तरूण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमधील 18 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाताच पोलीस आणि नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. घटनास्थळी मोठ्या प्रमणात बघ्यांनी गर्दी केल्याने प्रशासनाला अडचणीला समोरे जावे लागले.

अन् दुचाक्याही पडल्या
अपघात झाल्यानंतर एसटी बस पुलावर आडवी झाली. यामुळे पुलावरून प्रवास करणार्‍या काही दुचाकी आणि त्यावर प्रवास करणारे प्रवासी थेट पुलाखाली पडल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. अपघातानंतर पुलाचे दुतर्फी कठडे तुटले असून काही दुचाकी प्रवासी पुलाखाली फेकले गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

रुग्णालयातून पोलीस गायब
पुणे रोडवरील ट्रक आणि एसटी बसचा झालेल्या अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल होत होते. जखमी जशी उपचारासाठी दाखल होत असताना, तसे त्यांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयांमध्ये गर्दी करत होते. या गर्दीमुळे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना रुग्णसेवेत अडथळे निर्माण झाले. या गर्दीवर नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयात पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हते. या गर्दीमुळे वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णांच्या मदतीसाठी आलेले त्यांच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक चकमक घडत होत्या. वैद्यकीय अधिकार्‍यांनी अनेकदा सूचना देऊनही प्राथमिक उपचारात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे आणखी येणार्‍या जखमींना दाखल करताना विलंब होत होता. या प्रकाराला वैतागून वैद्यकीय अधिकार्‍यांनी पोलिसांना संपर्क केला. तरीही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा रुग्णालयात अशा वेळेस पोलीस कर्मचारी गायब होतात, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकार्‍यांनी खासगीत व्यक्त केली.

हे आहेत जखमी
अकबर जनुद्दीन शेख (शिरूर), शालन महादेव साठे, महादेव दादू साठे (पुणे), एकनाथ येडे, प्रसाद धनंजय चव्हाण (चांदेकसारे, कोपरगाव), शुभम किशोर दगडे (नगर), भरत काकासाहेब काकडे (किन्ही, ता. आष्टी), जॉर्ज गायकवाड (नगर), काशिनाथ निवृत्ती पोकळे (आष्टी), एसटी वाहक राजेंद्र मारूती पवार (जामखेड), रामचंद्र चौधरी (नगर) यांचा समावेश आहे. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या