Type to search

Breaking News Featured जळगाव

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 3806 बेडचे नियोजन

Share
Jalgaon

आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

जळगाव – (जिमाका वृत्तसेवा)

जगभर फैलावलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व लॉकडाऊनच्या काळात नागरीकांचे लाभणारे सहकार्य यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाचा मृत्यु झाला आहे.  भविष्यात कुठलीही आपत्कालीन परिस्थती उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे.

असे असले तरी भविष्यात काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर त्यास सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यात कोरोनाच्या संशयित रुग्णांची तपासणी करणे, त्यांचे विलगीकरण करणे, पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करणे आदि बाबींसाठी जिल्हाभरात 3 हजार 806 बेडची तयारी ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी शासनाच्या आरोग्य विभागास पाठविली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन तसेच माहिती घेऊन जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांचे सर्वेक्षण केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा रुग्णालयाचे कोविड 19 रुग्णालय म्हणून रुपांतर केले आहे. यासह जिल्ह्यातील इतर शासकीय व खाजगी 16 रुग्णालयांमध्ये नागरीकांना दाखल करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या रुग्णालयांमध्ये 501 बेड सर्व सुविधांसह तयार झाले असून आवश्यकता भासेल त्याप्रमाणे 2 हजार 919 बेड तयार ठेवून वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बेड तयार करण्यात आलेले रुग्णालये व बेडची संख्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय -100, शाहू महाराज रुग्णालय-35, उप जिल्हा रुगणालय, चोपडा-30, मुक्ताईनगर-15, जामनेर-15, जिल्ह्यातील सर्व 17 ग्रामीण रुगणालयांमध्ये प्रत्येकी 10 बेड याप्रमाणे 170 बेड, तर भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयात 136 बेड तयार करण्यात आले आहे.

तर ऑर्डिनन्स फॅक्टरी, वरणगाव-50, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय-100, आदिवासी वसतीगृहे-2 हजार 20, मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे वसतीगृह-471, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्पोटर्स क्लब-218 व चैतन्य आयुर्वेदिक हॉस्पिटल-60 असे एकूण 2 हजार 919 बेड तयार ठेवून दुसऱ्या टप्प्यात वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर कोरोनाचे संशयित व गंभीर नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी 274 बेडची तयारी करण्यात आली आहे. यापैकी 234 बेड तयार असून 40 बेड दुसऱ्या टप्प्यात वापरण्यात येणार आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-70, शाहू महाराज रुग्णालय-10, उप जिल्हा रुगणालय, चोपडा-30, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय-70, भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयात 54 बेड तयार असून ऑर्डिनन्स फॅक्टरी, वरणगाव-40 बेड दुसऱ्या टप्प्यात वापरण्यात येणार आहे.

तसेच कोरोनाचे पॉझिटिव्ह व उपचार सुरु असलेले गंभीर रुग्णांसाठी 112 बेडचे नियोजन असून यापैकी 102 बेड तयार असून 10 बेड दुसऱ्या टप्प्यात वापरण्यात येणार आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-30, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय-30, भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयात 10, ऑर्किड हॉस्पिटल-2, गणपती हॉस्पिटल-20, इंडोअमेरिकन हॉस्पिटल-10 असे 102 बेड तयार आहेत. तर ऑर्डिनन्स फॅक्टरी, वरणगाव-10 बेड तयार ठेवून ते दुसऱ्या टप्प्यात वापरण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!