Type to search

Breaking News Featured जळगाव

जळगाव : भोकर येथील बालकाचा मृतदेह पाचव्या दिवशी आढळला

Share
Bhokar

जळगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील भोकर येथील ११ वर्षीय बेपत्ता रोहित नवल सैंदाणे या बालकाचा मृतदेह पाचव्या दिवशी गावाजवळील एका मक्याच्या शेतानजीकच्या छोट्याशा रस्त्याच्या बाजूला सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आढळला. यावेळी बालकाच्या अंगावर फक्त अंडरपँड होती. तर मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने दुर्गंधी येत होती. या घटनेत घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भोकर येथील सेंटीग काम करणारे नवल गुमान सैंदाणे यांचा मुलगा रोहित हा मुलगा १२ रोजी गावातील एका लग्न समारंभात सायंकाळपर्यंत पगतीत जेवण वाढत होता. सायंकाळी ५ वाजेपासून तो बेपत्ता झाला. याबाबत त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

गावातील भगवान वामन सोनवणे हे शेतकरी सोमवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले होते. यावेळी काही अंतरावरुन दुर्गंधी येत होती. ही दुर्गंधी कशाची? हा शोध घेण्याचा प्रयत्न शेतकर्‍याने केला, असता त्यांना एक मृतदेह आढळला. त्यांनी हा मृतदेह गावातील रोहितचा असल्याचे ओळखले. यासंदर्भात त्यांनी गावात कळवले असता काही वेळातच घटनास्थळी ग्रामस्थ पोहचले.

रोहितच्या मृतदेहाच्या काही अंतरावर शौचास जाण्यासाठीचा पाण्याचा डबा आढळला. परंतु, घटनास्थळ लक्षात घेता गावातील बालक शौचाला एवढ्या लांब आणि शेतात येणार नाही. तसेच गावातून तो फक्त अंडरपँडवर येवू शकत नाही. त्यामुळे या संशयास्पद घटनेत घातपात झाल्याची दाट शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली.

या बालकासोबत अनैसर्गिक कृत्य (कुकर्म) झाले असावे. किंवा नरबळी, जादूटोणा आदी प्रकारातून या बालकाचा बळी गेल्याचाही संशय आहे. मृतदेह आढळल्याचे कळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळाकडे तपासकामी रवाना झाला आहे.

त्याठिकाणी पोलिसांचे डॉग स्कॉडने तपास केला. पोलीस पंचनाम्यानंतर या बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. रोहितच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांनी या घटनेमुळे आक्रोश केला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!