Type to search

सटाणा : खा. डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात प्रचार केल्याने आणला ‘अविश्वास ठराव’?

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सटाणा : खा. डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात प्रचार केल्याने आणला ‘अविश्वास ठराव’?

Share

सटाणा (ता.प्र.) सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांच्यावर बारा संचालकांनी अविश्वास ठराव आणल्याने बागलाणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कृउबा संचालकांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सदर ठराव पारित केला आहे.

अविश्वास ठरावाला लोकसभा निवडणूकीची पाश्वभूमी असल्याची चर्चा असून भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात सोनवणे यांनी प्रचार केल्याने भाजप समर्थक संचालकांनी हा अविश्वास ठराव आणल्याची तालुक्यात चर्चा आहे.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा संचालकांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केलेल्या अविश्वास ठरावात म्हटले आहे की, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी बांधवांचे कृषी उत्पन्नाचे खरेदी विक्री बाबत नियमन करते.

शेतकऱ्यांना योग्य भाव देऊन विक्री केलेल्या मालाची अदायगी योग्य रीतीने व्हावी याबाबत संचालक मंडळाचा नेहमी आग्रह असतो. मात्र सभापती मंगला सोनवणे यांनी शेतमाल खरेदी करूनही शेतकऱ्याना विक्री किंमत अदा न करणाऱ्या व्यापार्यांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही .

सभापती सोनवणे यांनी नियमाप्रमाणे काम करणे व मंजूर उपविधीप्रमाणे काम करणे अभिप्रेत असताना संबंधित सभापती त्यांचे पती प्रवीण सोनवणे हे कोणत्याही अधिकाराशिवाय संचालक मंडळ सभेस उपस्थित असतात व संस्थेच्या कामकाजाबाबत हस्तक्षेप व अरेरावी करतात.

यामुळेच सोनवणे यांच्यावर अविश्वास ठराव आणत असल्याचे म्हटले आहे. सभापती मंगला सोनवणे या संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी प्रमाणे बाजार समितीचे कामकाज करतात. विषय पत्रिकेनुसार विषयांवर चर्चा न करता मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जातात तसेच विषय पत्रिकेतील विषयांव्यतिरिक्त अन्य विषयांवर देखील निर्णय घेतल्याचे दर्शवून परस्पर इतिवृत्तद्वारे ठराव झाल्याचे दर्शवितात.

संचालक यांनी मासिक संचालक मंडळ सभेत संबंधित विषयांवर केलेले मतप्रदर्शन अथवा विरोध रीतसर नोंदवून घेतले जात नाही. संस्थेच्या मंजूर उपविधी व उद्दिष्टं प्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तसेच बाजार समितीस सुख सुविधा निर्माण करण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत अथवा त्या अनुषंगाने निर्णय घेतले जात नाहीत यामुळे प्रस्तुत संचालक मंडळ हे सदर पत्रान्वये नमूद केलेल्या सभापती मंगला सोनवणे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव प्रस्तावित करीत असल्याचे ठरावात नमूद केले आहे.

अविश्वास ठरावासाठी आवश्यक असलेल्या बारा संचालकांनी प्रस्तुत मागणी पत्रावर सह्या केलेल्या असून त्यांनी केलेल्या मागणीनुसार विहित मुदतीत विशेष सभा आयोजित करून योग्य तो वरील विषयाच्या अनुषंगाने निर्णय घेणे कामी कारवाई करणे आवश्यक असल्याचे अविश्वास ठरावात म्हटले आहे.

अविश्वास ठरावावर संचालक संजय देवरे, पंकज ठाकरे, प्रकाश देवरे, नरेंद्र अहिरे, प्रभाकर रौंदळ, मधुकर देवरे,संदीप साळे, सरदारसिंग जाधव, संजय सोनवणे,रत्नमाला सूर्यवंशी, रेणूबाई माळी, सुनिता देवरे यांच्या सह्या आहेत.
याबाबत बोलताना मंगला सोनवणे यांनी,बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा महिलेला सभापती होण्याचा बहुमान प्राप्त झालेली असताना गेल्या वर्षभरात सुमारे पाच कोटी रुपयांची विकासकामे केली.

बाजार समितीला राजकीय पुढाऱ्यांचा अड्डा होऊ दिला नाही. भ्रष्टाचार विरहित पारदर्शक काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून काही संचालकांच्या गैर अपेक्षाना साथ न दिल्यामुळे संबंधितानी अशी भूमिका घेतली असल्याचे सोनवणे यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!