सहलीच्या बसची ट्रॅक्टरला धडक धांदरफळच्या 18 विद्यार्थ्यांसह 22 जखमी

सहलीच्या बसची ट्रॅक्टरला धडक  धांदरफळच्या 18 विद्यार्थ्यांसह 22 जखमी

पुणे-मुंबई महामार्गावर अपघात : खताळ जनता विद्यालयाचे विद्यार्थी

पुणे /संगमनेर (प्रतिनिधि) – अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील बी.जे.खताळ जनता विद्यालयाची सहल घेऊन जाणार्‍या बसची रस्त्यात उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात बसमधील 18 विद्यार्थी, तीन शिक्षक व बस चालक असे एकूण 22 जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे (दि.25) पावणेचारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगाव खिंडीत झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी. जे. खताळ जनता विद्यालय या शाळेची सहल कोकणात गेली होती. अहमदनगर बस डेपोची बस (क्रमांक एम एच 14/ बी टी 4128) शाळेच्या सहलीसाठी देण्यात आली होती. या बसचे चालक नईम शेख होते. शाळेतील 45 मुलांना घेऊन ही सहल सोमवारी निघाली. यासोबत आगारातील आणखी एक बस (क्रमांक एम एच 14/ बी टी 4325) देखील या सहलीत होती. शाळेच्या दोन बसमधून सर्व विद्यार्थी प्रवासाला निघाले. अपघातप्रकरणी बसचालक नईम शेख यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहलीची बस पाली, खोपोली, रायगड मार्गे लोणावळ्याला मंगळवारी रात्री पोहचली. त्यानंतर, लोणावळ्यातून पहाटे पावणेतीनच्या सुमारास जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरून पुण्याकडे निघाली. तळेगाव दाभाडे येथील खिंडीजवळ बसच्या पुढे एक ट्रक जात होता. खिंडीजवळ आल्यानंतर ट्रकने अचानक डाव्या बाजूने मार्ग काढून ट्रक पुढे गेली. त्यावेळी बस चालक शेख यांना समोर भर रस्त्यात उसाने भरलेलला एक ट्रॅक्टर थांबलेला दिसला. ट्रॅक्टरच्या मागे कुठलाही रिफलेक्टर, इंडिकेटर न लावता निष्काळजीपणाने ट्रॅक्टर रस्त्यात लावला होता. त्यामुळे बसची ट्रॅक्टरला मागच्या बाजूने जोरदार धडक बसली. या अपघातात बस चालक शेख यांना गंभीर दुखापत झाली. तर, बसमधील नऊ विद्यार्थिनी आणि नऊ विद्यार्थी तसेच तीन शिक्षकांना देखील इजा झाली.

घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकानमधून जखमींना नजीकच्या दोन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याचे शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात असून तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे हे सकाळी पवना हॉस्पिटलमध्ये पोहोचले. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दुरध्वनीद्वारे हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांवर सुरू असलेल्या उपचारांबाबत महिती घेत वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. प्राथमिक उपचारानंतर जखमींना संध्याकाळी पाच वाजता तळेगाव दाभाडे येथून संगमनेरातील तांबे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याचे कातोरे यांनी ‘सार्वमत’शी बोलताना सांगितले.

किरण सुकदेव कोकणे ही विद्यार्थीनी बी. जे. खताळ माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेते. ती कुस्तीपटू असून तिने आजवर अनेक पारितोषिक मिळविली आहेत. बसमध्ये पहिल्या सिटावर बसलेल्या किरण कोकणे व बसचालक नईम शेख या दोघांवर तळेगाव दाभाडे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

धांदरफळ खुर्द येथील बी. जे. खताळ माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीतील 91 विद्यार्थ्यांची सहल राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेस मधून सोमवारी 23 डिसेंबरला पहाटे निघाली होती. उर्वरित विद्यार्थ्यांची बस दोनच्या सुमारास धांदरफळमध्ये पोहोचली. त्यावेळी संगमनेरचे आगाराचे कार्यशाळा प्रमुख ए. बी. बनकर, वाहतूक नियंत्रक जयदीप काशिद, वरिष्ठ लिपीक साजीद पठाण आदी यावेळी उपस्थित होते. पालकांनी विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमाप्रमाणे जखमी विद्यार्थी, शिक्षकांना वैद्यकीय बिलांची प्रतिपुर्ती मिळेल. अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाचे जिल्हा पातळीवरील अधिकारी तळेगाव दाभाडे येथे पोहोचले. जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला. आम्ही देखील सर्वजण धांदरफळमध्ये जात विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक यांना धीर दिला असल्याचे संगमनेर आगार कार्यशाळा प्रमुख ए. बी. बनकर यांनी सांगितले.

अपघातातील जखमी
अनिकेत दत्तात्रय घुले (वय 12), दीपाली वालचंद गोडसे (वय 15), मानसी राजेंद्र शेटे (वय 15), साक्षी अरुण कोकणे (वय 14), सुदर्शन भाऊसाहेब खटाव (वय 13), प्राची अशोक गुंजाळ (वय 15), कार्तिकी शांताराम खताळ (वय 15), निकीता संदीप खताळ (वय15), किरण सुखदेव कोकणे (वय 15), संदेश शांताराम खताळ ( वय 14), तेजल रमेश आहेर (वय 15), धीरज बाबासाहेब खताळ ( वय 14), शिवाजी रामभाऊ शेटे (वय 16), मयूर मीनानाथ खताळ (वय 13), सिद्धार्थ सुखदेव गोबणे (वय 13), चैताली संजय घुले (वय 16), प्रज्ञा संदीप खताळ (वय 16), वनिता संतोष देवगिरे (वय 15), शिक्षक सखाराम पांडुरंग भालेराव (वय 52), चांदसाब कसम अत्तार (वय 55), नाना हरिभाऊ बरडे (वय 59) आणि बस चालक नईम रफीक शेख अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर महामार्गालगतच्या दोन रुग्णालयांत उपचार करण्यात आले. 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची ही सहल होती. बसमध्ये एकूण 45 विद्यार्थी होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com