Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार : दारुविक्री बंद असल्याने तळीरामांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गोदामच फोडले...

नंदुरबार : दारुविक्री बंद असल्याने तळीरामांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गोदामच फोडले ; पाच लाखाच्या विदेशी दारुची चोरी

नंदुरबार | प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गोदाम फोडून त्यातील ५ लाख १३ हजार ४४० रुपयांची दारु तळीरामांनी लंपास केल्याची घटना घडली. विकत दारु मिळत नसल्याने तळीरामांनी चक्क शासकीय गोदाम फोडून आपली तहान भागविण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.

- Advertisement -

सध्या कोरोना या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. त्या पार्श्‍वभुमीवर दि.२३ मार्चपासून देश लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्हयात कलम १४४ लागू केला आहे. तसेच संचारबंदी व लॉकडाऊन सुरुच आहे. या कालावधीत किराणा, भाजीपाला, मेडीकल स्टोअर, दवाखाने, दुध विक्रेते यांच्याव्यतिरिक्त इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून जिल्हयातील सर्व बियरबारदेखील बंद आहेत.

त्यामुळे तळीरामांची गैरसोय झाली आहे. तरीही चोरीछुपे दारुविक्री शहरासह जिल्हाभरात सुरुच आहे. परंतू खुली विक्री होत नसल्याने तळीराम अधिर झाले आहेत. त्यामुळे तळीरामांनी चक्क शासकीय गोदामात जप्त करण्यात आलेल्या दारुवरच डल्ला मारला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आरटीओ कार्यालयाजवळील शासकीय दूध डेअरीच्या कंपाऊंडमध्ये जप्त केलेली दारु साठवण्याचे गोदाम आहे.

दि.२८ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत अज्ञात तळीरामांनी या गोदामाच्या छतावरील सिमेंटचे पत्रे तोडून त्यात साठवण्यात आलेल्या ५ लाख १३ हजार ४४० रुपये किमतीच्या विदेशी दारुच्या ७ हजार ५८९ बाटल्या चोरुन नेल्या आहेत. याबाबत सुभाष किसन बावीस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात तळीरामांविरुद्ध भादंवि कलम ३८०, ४५७, ४५४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.पी.सोनवणे करीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिर्‍हाडे यांनी भेट दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या